Pakistan Drug Connection | ड्रग्जचे पाकिस्तान कनेक्शन 
क्राईम डायरी

Pakistan Drug Connection | ड्रग्जचे पाकिस्तान कनेक्शन

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण सोनावणे, ठाणे

गेल्या काही वर्षांत देशासह राज्यात अमली पदार्थांच्या वापराचे व तस्करीचे प्रमाण भयावह म्हणता येईल, इतके वाढले आहे. प्रामुख्याने समुद्रीमार्गाने या अमली पदार्थांची आयात होताना दिसत आहे. तसेच यामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील ड्रग्ज तस्कर सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ ड्रग्ज तस्करीपुरता मर्यादित नसून यामागे एक सुनियोजित भारतविरोधी षङ्‌यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे....

कळवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत खारेगाव टोलनाका परिसरातून फिरोज अब्दुल खान (वय ५२, अंकलेश्वर, जिल्हा भरूच, गुजरात) या अमलीपदार्थ तस्करास ८ मे २०२६ रोजी ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने ३.२९ किलोग्रॅम वजनाच्या चरससह अटक केली होती. या तस्कराच्या चौकशीतून त्याने हे अमलीपदार्थ काश्मीर खोऱ्यातून ठाण्यात विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. त्यानंतर ठाणे पोलिसांनी काश्मीरमधून आणखी दोघा तस्करांना अटक केली आहे. याच प्रकरणात आता पाकिस्तान कनेक्शन समोर येत असून, ठाणे पोलिसांच्या तपासातून नेमके पाकिस्तान कनेक्शन कसे आहे, नेमकी ही तस्करी कशी होते याचे अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. हे ड्रग्ज थेट पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीर व त्यानंतर मुंबई, ठाण्यात तस्करी करून विक्रीसाठी आणल्याचेदेखील धागेदोरे तपासातून समोर येत आहेत.

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला खरेगाव टोलनाका येथे एकजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी ८ मे २०२६ रोजी सापळा लावून फिरोज अब्दुल खान या अमलीपदार्थ तस्करास ३ कोटी २ लाख रुपये किमतीच्या ३.२० किलोग्रॅम वजनाच्या चरस आणि १२ हजार ९८४ नशेच्या कॅप्सूल्ससह अटक केली होती. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये हे अमली पदार्थ काश्मीर खोऱ्यातून ठाण्यात विक्रीसाठी आणले होते, अशी माहिती समोर आली. त्यानंतर ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने थेट काश्मीर येथे जाऊन १९ मे रोजी मोहमद अश्रफ गुलाम अहमद शेदा (वय ४२, समशीपुरा, जिल्हा अनंतनाग, काश्मीर) यास अटक केली. तर त्यांचा आणखी एक साथीदार शौकत अजीज मीर ऊर्फ जुबेर (देवर लोलाब, जिल्हा कुपवाडा, काश्मीर) यास काश्मीरच्या कूपवाडा परिसरातून ठाणे पोलिसांनी ६ जून २०२६ रोजी अटक केली.

काश्मीरमधून अटक केलेल्या दोघांना स्थानिक कोर्टात हजर करून त्यांचा ट्रान्झिट रिमांड घेऊन ठाण्यात आणले. न्यायालयाने दोघांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अटकेतील आरोपी चरस अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जम्मू-काश्मीर राज्यातून ठाण्यात विक्रीकरिता घेऊन आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्याने हे ड्रग्ज थेट पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीर व त्यानंतर मुंबई ठाण्यात तस्करी करून विक्रीसाठी आणल्याचेदेखील धागेदोरे तपासातून समोर येत आहेत. अटकेतील आरोपी फिरोज अब्दुल खान याच्याविरोधात अहमदाबाद व जम्मू येथे दोन अमलीपदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असून, त्यास दोन्ही गुन्ह्यांत शिक्षा ठोठावण्यात आली होती. दोन वेळा शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा चरस तस्करी सुरू केली होती, असे पोलिस तपासातून समोर आले असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली.

तस्करीसाठी डार्कवेबचा वापर!

ठाण्यात पकडण्यात आलेल्या अनेक ड्रग्ज प्रकरणात डार्कवेबचे कनेक्शन समोर आले आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर या बड्या शहरांसह अनेक ठिकाणी पोहोचवण्यात येणारे घातक ड्रग्ज डार्क वेबच्या माध्यमातून विदेशातून भारतात मागवले जातात. त्यानंतर या ड्रग्ज कन्साइन्मेंटला समुद्रमार्गे विविध शहरांत पोहोचवले जाते, अशी बाब तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली आहे. डार्क वेब म्हणजे इंटरनेटवरील तस्करी जगताचे स्वतःचे छुपे ब्राऊजर आहे. येथे घातक हत्यार, लोकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स, ई-मेल, लोकांचे फोन नंबर, ड्रग्स, नकली करन्सी, इतर वस्तू सहज मिळतात. इंटरनेटची ही दुनिया अदृश्य आहे. येथे युजर्सची ओळख गुप्त राखली जाते.

आंतरराष्ट्रीय तस्करी!

सागरीमार्गाने भारतात होणारी अमली पदार्थाची सर्वाधिक तस्करी पाकिस्तानमधून होत आल्याचे वेळोवेळी तपास यंत्रणांनी उघड केले आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. यादरम्यान एका अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात कराचीतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला भारतीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून पाकिस्तान भारतात सागरी मार्गे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी करीत असल्याचे उघड झाले आहे. तालिबान आणि अफगाणिस्तानचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत अफूची शेती आहे. जगातील चरस व अफूच्या उत्पादनात अफगाणिस्तानचा वाटा ८० टक्के आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात अफूपासून तयार होणाऱ्या हेरॉईन, चरस व इतर अमली पदार्थांची पाकिस्तान मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT