गोव्याला ड्रग्जचा विळखा 
क्राईम डायरी

Drug trafficking : गोव्याला ड्रग्जचा विळखा

गोव्यात दरवर्षी ड्रग्जचे होतात दीडशे गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

प्रभाकर धुरी, पणजी

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू होतो आणि पर्यटकांचा गोव्यात पूर येतो.त्यातील काहीजण ड्रग्जचा व्यवसाय करण्यासाठी येतात तर काहीजण ड्रग्ज सेवनासाठी. या तस्करीत परदेशी, परप्रांतीय आणि गोमंतकीय यांचा वाटा मोठा आहे. यातील चक्रावणारे सत्य हे आहे की गोव्यातून ड्रग्ज आणि ड्रग्ज पेडलर यांना हद्दपार करणे खूपच कठीण आहे, कारण एकाला अटक केली आणि तुरुंगात पाठवले की दुसरा तयार होतो. त्यांची एक अखंड साखळी तयार होते, जी गोव्याच्या संस्कृतीला विळखा घालून बसली आहे.

राज्यात दरवर्षी सरासरी दीडशे ड्रग्जचे गुन्हे दाखल होतात. क्राइम ब्रँचने महिनाभरापूर्वी बंगळुरू येथील एका व्यक्तीकडून 11 कोटी रुपयांचा हायड्रोपॉनिक गांजा जप्त केला होता. तेव्हाची ती सर्वात मोठी कारवाई होती. महिना सव्वा महिन्यात तब्बल 43.20 कोटी रुपयांचे 4.32 किलो कोकेन चिचोळणा मुरगाव येथे जप्त करण्यात आले. ही त्यानंतरची सर्वात मोठी कारवाई ठरली होती. पुढच्या सातच दिवसात गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) शिवोली येथे छापा टाकून 110.72 ग्रॅम एलएसडी ड्रग्ज जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 11.07 कोटी रुपये एवढी आहे. याप्रकरणी अटक केलेला मूळ पलक्कड,केरळ येथील मोहम्मद समीर (29 ) गेल्या 5 वर्षांपासून गोव्यात राहत होता आणि गेस्ट हाऊस चालवत होता. शिवाय स्वतंत्र घर भाड्याने घेऊन तो ड्रग्जचा व्यवसाय चालवत होता.

थेंबात विकला जाणारा एलएसडी!

एएनसीने जप्त केलेल्या एलएसडी द्रावणाचे प्रमाण अंदाजे 10 ते 12 लाख एलएसडी ब्लॉट्स किंवा एलएसडी पेपर्स तयार करण्यासाठी पुरेसे आहे. या एका ब्लॉटची किंवा एलएसडी पेपरची किंमत 3 ते 5 हजार रुपये आहे. हा ड्रग्ज थेंबात विकला जातो आणि आवश्यकतेनुसार त्याच्या ग्राहकांना द्रव आणि ब्लॉटिंग पेपर्स पुरवला जातो. एलएसडी लिक्विड सायकेडेलिक ड्रग्जचा वापर सायट्रान्स पार्टी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि तो जगातील सर्वात शक्तिशाली अमली पदार्थांपैकी एक मानला जातो.

कॉफी आणि चॉकलेटच्या पाकिटातून कोकेन!

चिकोळणा येथे जप्त केलेले 43.20 कोटींचे कोकेन चॉकलेट आणि कॉफीच्या पाकिटात लपवून आणले होते.विशेष म्हणजे बायणा, वास्को येथे राहणारी मुख्य संशयित रेश्मा वाडेकर हिने थायलंडमधून हा ड्रग्ज प्रथम दिल्लीत व तेथून गोव्यात आणला होता. हा ड्रग्ज वितरित करण्यासाठी तिला स्मशानभूमीत मृतदेहाची विल्हेवाट लावणारा तिचा पती मंगेश वाडकर व निबू व्हिन्सेंट (45, मूळ कोलकाता) मदत करणार होते. रेश्मा हिला यापूर्वी वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक झालेली आहे.मात्र ,डोळे दिपवणारा पैसा या धंद्यात असल्याने दिमतीला वकील घेऊन ती ड्रग्ज व्यवसायात उतरली आहे.

कुणाचा किती टक्का !

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यात गोमंतकीयांचा सहभाग मोठा आहे. एएनसीने 1 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 762 गुन्हे दाखल करून 895 जणांना अटक केली आहे. यात 253 (28.26 टक्के) गोमंतकीय आहेत, 505 (56.42 टक्के) परप्रांतीय, तर 137 (15.30 टक्के) विदेशी नागरिकांचा समावेश आहे. 2024 मध्ये राज्यात विविध पोलिसांनी 162 गुन्हे दाखल करून 190 जणांना अटक केली आहे. त्यातील सर्वाधिक 55 (28.94 टक्के) गोमंतकीय आहेत, 111 (58.42 टक्के) परप्रांतीय, तर फक्त 24 (12.63 टक्के) विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

112 दिवसांत 66 कोटींचे ड्रग्ज जप्त!

1 जानेवारी 2025 ते 22 एप्रिल 2025 या काळात (112 दिवसांत ) 9 प्रकरणांमध्ये तब्बल 66.34 कोटींचे 19.3475 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. 2024 मध्ये वर्षभरात उत्तर व दक्षिण गोव्याचे पोलिस, अमली पदार्थ विरोधी विभाग आणि क्राइम ब्रँचने मिळून 10 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. 2025 मधील सुरवातीच्या जवळपास 4 महिन्यातील ड्रग्ज जप्तीचा आकडा गोवा दिवसेंदिवस ड्रग्जच्या विळख्यात जखडला जातोय याची साक्ष देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT