विठ्ठल हेंद्रे, सातारा
डॉ. संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी तरुणीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना तिच्या हातावरील 25 शब्दांच्या मजकुराने समाजमन सुन्न झाले आहे. तिच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील फौजदार गोपाल बदने याने अत्याचार केला. खाकी वर्दीतील अधिकारीच या अत्याचारी घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याने संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने ढवळून निघाला. याशिवाय फलटणातील युवक प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही डॉ. संपदाने मृत्यूपूर्व हातावरील मजकुरात म्हटले आहे. डॉ. संपदाचा पाच महिन्यांपासून ’कागदावर’ इथल्या व्यवस्थेशी लढा सुरू असल्याचेही समोर आले आहे. तिने केलेल्या काही तक्रार अर्जांवरून इथल्यो निगरगट्ट व मुर्दाड ‘व्यवस्थे’नेच तिचा बळी घेतल्याचे जळजळीत वास्तव आहे...
डॉ. संपदा मुंडे या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी युवतीचा मृतदेह फलटणमधीलच मधुदीप या हॉटेलमधील रूममध्ये दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 7.15 वाजता आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, ती आत्महत्या असल्याचे समोर आले. घटनास्थळाचा पंचनामा करत असताना असे दिसून आले की, डॉ. संपदा त्या हॉटेलमध्ये 23 ऑक्टोबर रोजीच मध्यरात्री 1.30 वाजता आली होती. त्यानंतर संपूर्ण घटनेला वाचा फुटली. डॉ. संपदाच्या हातावर ‘माझ्या मरणाचे कारण पोलिस निरीक्षक गोपाल बदने ज्याने माझा 4 वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असा मजकूर होता.
हालअपेष्टा सोसून व कर्ज काढून डॉक्टरकीपर्यंत शिकवलेल्या पोटच्या गोळ्याने आत्महत्या केल्याचे मुंडे कुटुंबीयांना समजल्यानंतर ते पार हादरून गेेले. अजूनही त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत, एवढा दु:खाचा डोंगर त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांवर कोसळला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी असलेल्या लेकीचा मृत्यूच त्यांना मान्य नाही. मृत्यूमागे पोलिस अधिकार्याचे नाव असल्याने कुटुंबीयांनी पहिल्या दिवसांपासून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे. दुसरीकडे डॉ. संपदाने पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व राजकारण्यांकडून अनेकदा उलटसुलट मेडिकल रिपोर्ट बनवण्यासाठी टॉर्चर केल्याचे तक्रार अर्जांवरून समोर आले आहे. यामुळे मुंडे कुटुंबीयांनी सरसकट या प्रकरणाची चौकशी करून दोषी आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून फौजदार गोपाल बदने हा आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. हेड कॉन्स्टेबल असणार्या बदने याने खात्याअंतर्गत परीक्षा दिल्याने तो फौजदार झाला आहे. फौजदार म्हणून फलटण येथील त्याचे पहिलेच पोस्टिंग आहे. बदने याचा विवाह झाला असून, तो 35 वर्षांचा आहे. डॉ. संपदा व बदने यांची कामाच्या निमित्ताने ओळख होऊन संपर्क होता. डॉ. संपदाने बदनेवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. दुसरा संशयित आरोपी प्रशांत बनकर हा आहे. प्रशांत उच्चशिक्षित आहे. डॉ. संपदा मुंडे या बनकर याच्या घरामध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्य करत होत्या. यामुळे ते दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. डॉ. संपदाने बनकर याच्यावर असा आरोप केला आहे की, त्याने 4 महिने शारीरिक व मानसिक छळ केला. डॉ. संपदाने या दोघांची हातावर नावे लिहून आत्महत्या केल्याने सद्यस्थितीला हे दोघेच मुख्य संशयित आरोपी आहेत. मात्र, आत्महत्या होण्याअगोदर डॉ. संपदाने काही पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, राजकारण्यांविषयी फलटण डीवायएसपी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केले आहेत. यामुळे ‘व्यवस्थे’नेही तिचा बळी घेतल्याची किनार आहे. यामुळे आरोपी दोनच राहणार की वाढणार, वाढले तर आणखी कोण असणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
डॉ. संपदा मुंडे हिची आत्महत्या समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच तिने 6 महिन्यांपूर्वी केलेले काही तक्रार अर्ज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. डॉ. संपदा फलटण उपजिल्हा रुग्णालयात 2 वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) म्हणून सेवा करत होती. याठिकाणी काम करत असताना पोलिस व त्यांनी आणलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी यातून एकमेकांशी संबंध येत होता. आरोपींची प्रकृती ठिक नसतानाही अनेकदा तिथे येणारे पोलिस ‘आरोपी फिट आहे’ असा खोटा रिपोर्ट देण्यास सांगत होते. मात्र, डॉ. संपदा जे खरे आहे व योग्य आहे तोच रिपोर्ट करत. पोलिसांना यामुळे अडचण येत होती. यातूनच जून 2025 व ऑगस्ट 2025 मध्ये तिने फलटण डीवायएसपींकडे तक्रार अर्ज केले होते. तसेच पोलिसांकडून कोणतेच सहकार्य होत नसल्याने मानसिक त्रास दिला जात असल्याने अखेर आणखी एक 4 पानांचा तक्रार अर्ज सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावाने केलेला आहे. अशाप्रकारे
डॉ. संपदा यांनी फलटणसह इतर काही ठिकाणीही सेवा केली आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकार्यांसोबत बोलणे झाले असता, डॉ. संपदा ही सरळमार्गी, जे खरं आहे तेच अशी स्ट्रेट फॉरवर्ड होती. कामाच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टींना ती थारा देत नव्हती. यातूनच व्यवस्थेशी तिचा झगडा होत होता. याचा मानसिक ताणतणाव तिच्यावर निश्चित होता, अशा बाबी स्पष्टपणे पुढे आल्या आहेत.
डॉ. संपदाच्या मृत्यूनंतर तक्रार अर्जात खासदार व त्यांचा पीए यावरून स्थानिक राजकारण ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा झाला. त्यांनीही या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा संबंध नसल्याचे धडधडीत सांगितले. दुसरीकडे दोन्ही संशयित आरोपी हे स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले. बनकर याच्या कुटुंबीयांनी त्यांची बाजू मांडून मुलाची चूक नसल्याचे म्हटले आहे. यामुळे डॉ. संपदाच्या मृत्यूनंतर आरोपांची झालेली सरबत्ती व त्यावर होत असलेले खुलासे अजून कुठपर्यंत जाणार व शेवट काय राहणार, यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.