डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या आटाळी गावातील चाळीत एकट्या राहणाऱ्या आजीच्या घरात घुसून चोरट्याने तिच्या अंगावरील सोन्याचा ऐवज लुटून नेला.
आजीने दागिन्यांसह स्वतःचा जीव वाचविण्यासाठी लुटारूशी निकराची झुंज दिली. मात्र लुटारूच्या ताकदीपुढे आजीचे प्रयत्न क्षीण झाले. लुटारूशी दोन हात करताना आजीला मृत्युला सामोरे जावे लागले. गुरूवारी (दि.20) रोजी रात्री घडलेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तपास चक्रांना वेग दिला आहे.
रजनी चंद्रकांत पाटकर (60, रा. सिध्दीविनायक चाळ, खापरीपाडा, ज्ञानेश्वर नगर, आटाळी, आंबिवली) असे आजीचे नाव आहे. आजीचा नातेवाईक हर्षल पाटकर यांच्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हर्षल पाटकर (रा. आंबिवली, हरिश्चंद्रनगर) यांना त्यांची आत्या पल्लवी पाटकर यांचा गुरुवारी (दि.20) रोजी रात्री फोन आला. त्यांनी सांगितले की, आजी रजनी पाटकर या घरात बेशुध्दावस्थेत पडल्या असून त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू आहे. हर्षल यांनी तात्काळ आजीच्या घरी धाव घेत रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल करत असताना आजीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची कर्णफुले असा जवळपास एक लाखांहून अधिक किंमतीचा सोन्याचा ऐवज गायब असल्याचे हर्षल यांच्या निदर्शनास आले.
गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या आजींना तात्काळ मोहन्यातील एका खासगी रुग्णालयात नेदाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डाॅक्टरांनी जखमी आजी रजनी पाटकर यांना मृत घोषित केले. आजीच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरण्यासाठी चोरटा घरात घुसला असावा. आजीने त्यास जोरदार प्रतिकार केला असावा. त्यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्याने रजनी आजीच्या तोंडावर वजनदार किंवा धारदार वस्तू मारून त्यांना गंभीर जखमी करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असावा. या झटापटीत आजींच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची संशय व्यक्त करत फिर्याद हर्षल पाटकर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आजीने या वयातही चोरट्यांसोबत दोन हात करण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत असून आजी मात्र जिवानिशी गेल्याने नातेवाइकांसह परिसरातील रहिवाशांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड, उपनिरीक्षक एन. एस. लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची पथके तयार करून चोरट्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यामध्ये गेल्या दोन आठवड्यांत चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या, वाहन चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे.