Dombivli Crime  pudhari photo
क्राईम डायरी

Dombivli Crime : २८ वर्षांनी खुनाचा उलगडा

तब्बल २८ वर्षांनंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या जुन्या प्रकरणाला कलाटणी

पुढारी वृत्तसेवा

बजरंग वाळुंज, डोंबिवली

बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा तब्बल २८ वर्षांनंतर उलगडा झाला आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान १९९८ मध्ये घडलेल्या या हत्येप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कृष्णन् याला बिहारमधून अटक केली असून या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

१४ डिसेंबर १९९८ रोजी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान मृत व्यक्ती शैलेश मोरे असल्याची माहिती समोर आली. त्यांचा मृत्यू अपघाती नसून हत्या झाल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश मोरे यांनी संदीप कृष्णन् याच्या बहिणीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता, याच रागातून संदीप कृष्णन् आणि त्याचे दोन साथीदार विनोद यादव आणि विनेश कृष्णन् यांनी पार्टीच्या बहाण्याने एकत्र येत शैलेश मोरे यांचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी शैलेश मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी फरार झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला मोठा कालावधी लागला. तब्बल २८ वर्षांनंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या जुन्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संदीप कृष्णन् याचा शोध घेत त्याला बिहारमधून अटक केली. अटकेनंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान या प्रकरणातील विनोद यादव आणि विनेश कृष्णन् हे अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनाही अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. २८ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्येतील मुख्य आरोपीला अटक झाल्याने तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT