सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका 30 ते 35 वयोगटातील अज्ञात व्यक्तीने रात्री एका 80 वर्षीय वृध्देच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दोडी बुद्रुक शिवारात शेतातील घरात 80 वर्षीय वृध्दा एकटीच राहत होती. 14 जुलै 2025 रोजी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. पीडित वृध्दा घरी झोपलेली असताना, अज्ञात व्यक्तीने दारावर हाक मारली. त्याने पीडितेला फसवून 'मी लाईट दुरुस्त करून देतो', असे सांगून तो घरात शिरला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या गळ्यातील 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून तो फरार झाला.
या प्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फोन लोकेशन व स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.