धुळे : साक्री तालुक्यातील मलांजन शिवारातील शेतातून शेती अवजारांची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, चोरट्यांकडून सुमारे 8 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एका आरोपीकडून गावठी पिस्तूलही हस्तगत करण्यात आले आहे.
शक्तीमान कंपनीचा रोटावेटर अज्ञात चोरट्यांनी चोरल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे पेरेजपूर शिवारातील नाल्याजवळून पोलिसांनी सुरेश उर्फ सुर्या रमेश गावीत आणि प्रभू होडया गावीत या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली शेती अवजारे आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक तपासात उघडकीस आले की, या दोघांविरुद्ध धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकूण दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, जयेश खलाणे, अमित माळी, संजय पाटील, रामलाल अहिरे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, तुषार सुर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, सुनिल पाटील, अमोल जाधव, राजीव गीते, मयूर चौधरी आणि नारायण चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.