धुळे : धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या १.५ कोटी रुपयाच्या हवाला रोकड लुटप्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या लुटीचा मास्टरमाइंड स्वतः स्कॉर्पिओ वाहनाचा सहचालक भरतभाई भालिया असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सुरत येथून त्यासह तिघांना ताब्यात घेतले असून ४२ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.
बुधवार (दि.9) रोजी, लखनऊहून निघालेली स्कॉर्पिओ (MH-43-CC-0264) गाडी मुंबईकडे निघाली होती. त्यात कल्पेश पटेल व सहचालक भरतभाई भालिया हे हवाला रकमेची ने-आण करत होते. पुरमेपाडा शिवारात स्कॉर्पिओला स्विफ्ट कारने ओव्हरटेक करत, शस्त्राचा धाक दाखवून दोघांना पळवून नेण्यात आले. काही वेळाने त्यांना महामार्गावर सोडून देण्यात आले आणि वाहनातून रोकड गायब करण्यात आली.
सुरुवातीला आरोपीकडून ४ कोटी असल्याचे सांगण्यात आले, परंतु नंतरी फिर्यादीत १.५ कोटी असल्याचे सांगण्यात आले. पटेल यांनी हे पैसे एग्रीकल्चर कंपनीचे असल्याचेही फिर्यादीत नमूद केले.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक धनंजय पाटील व श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली. चौकशीत भरतभाई भालिया अचानक गायब झाला, यामुळे संशय वाढला. सुरत येथे पाठवलेल्या पथकाने त्याला अटक करण्यात आली. त्याने आणखी तीन साथीदारांची नावे उघड केली. चौघांना अटक करण्यात आली असून, ४२ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
भालिया याने शिरपूरपासून वाहन चालवण्याचा ताबा घेतल्यावरच साथीदारांना लोकेशन दिले आणि पुरमेपाडा शिवारात लुटीचा बनाव आखला. त्यानंतर बनावट लूट करत रक्कम गायब करण्यात आली. या तपासात भालिया हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांनी विवेक पवार आणि पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.