धुळे : येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत सापडलेल्या बेहिशेबी रोकड प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आल्यानंतर धुळे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून गुरुवारी (दि. 22) रात्री उशिरापर्यंत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाटील यांची चौकशी केली तसेच विश्रामगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आवक- जावक रजिस्टर जप्त केले आहे. दरम्यान, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे. पी. स्वामी आणि पोलिस अधीक्षक धिवरे यांच्यातदेखील चर्चा झाली आहे.
धुळे, नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या विधानमंडळ अंदाज समितीने बुधवारी (दि. 21) धुळ्यात भेट दिली. या समितीने मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठका सुरू असतानाच येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांची ये- जा सुरू होती. या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केले जात असल्याची माहिती मिळाल्याने माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसैनिकांसह या खोलीबाहेर आंदोलन सुरू केले. तत्पूर्वी या विश्रामगृहामध्ये असलेल्या कक्ष अधिकारी किशोर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यानंतर माजी आ. गोटे यांनी धुळे ते मुंबई दरम्यान पोलिस, महसूल आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून ही माहिती दिली. तरीही रात्री 11 पर्यंत पोलिस दल या खोलीजवळ फिरकले नव्हते. विशेष म्हणजे विश्रामगृहाच्या भिंतीला लागूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय आहे. मात्र, या कार्यालयाला सूचना देऊनदेखील त्यांचे पथक येत नव्हते, अशी तक्रारदेखील गोटे यांनी केली आहे. अखेर रात्री उशिरा पोलिस व महसूलच्या पथकाने दाखल होत पहाटे उशिरापर्यंत नोटांची मोजदाद करत एक कोटी 84 लाख 84 हजार इतकी रक्कम ताब्यात घेतली. ही रोकड ट्रेझरीला जमा करण्यात आली असून, पोलिस अधीक्षक धिवरे यांनी कलम 173 (3) अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. धिवरे यांनी त्यांच्या दालनात ही चौकशी केली.
याच विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुलमोहर विश्रामगृहाशी संबंधित कर्मचारी यांचे जबाब नोंदवण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. यात आणखी काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. विश्रामगृह परिसरातील सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. फुटेज जप्त करण्याची मागणी माजी आ. गोटे यांनी केली होती. त्यातून ही रक्कम देण्यासाठी नेमके कोण आले होते तसेच पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तींची माहिती उघड होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. राज्यस्तरावरील नेमलेल्या विशेष पथकामार्फतही या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे