धुळे: धुळे शहरात कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ शेख रफीयोद्दीन यांच्या खून प्रकरणातील आरोपी विजय गोयर आणि विक्रम गोयर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. मात्र, या दोघांना खटल्याच्या तारखांशिवाय धुळे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, हे आरोपी शहरात आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या कोणत्याही कृतीवर कठोर कारवाई करण्यात येईल.
18 जुलै 2017 रोजी, धुळे शहरातील पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस समोर गुड्ड्या उर्फ शेख रफीयोद्दीन शेख शफीयोद्दीन याचा पिस्तुल, तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या हल्ल्यामागे आर्थिक आणि गुन्हेगारी वर्चस्व राखण्याचा हेतू असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
CCTV फुटेजच्या आधारे विजय उर्फ बडा पापा गोयर, विक्रम उर्फ विक्की गोयर व इतर 18 साथीदारांनी हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात भादंवि कलम 302, 120(ब), 212, 504, 506, 34 आणि आर्म अॅक्टच्या कलम 3, 4, 25, 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) 1999 अंतर्गतही कारवाई करण्यात आली असून, आरोपींना नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर विजय गोयर व विक्रम गोयर यांना अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यांना केवळ न्यायालयीन तारखांसाठीच धुळे शहरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा सत्र न्यायाधीश, धुळे यांच्या पूर्वपरवानगीशिवाय शहरात प्रवेश करता येणार नाही, असे बजावण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आरोपींमध्ये कोणताही आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा डायल 112 वर संपर्क साधावा. त्याबाबत संबंधित व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाईल. कोणत्याही आरोपीचे पोस्टर, बॅनर किंवा प्रचार साहित्य सार्वजनिक ठिकाणी लावू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही धिवरे यांनी केले आहे.