धुळे : जिल्हा पोलिसांनी आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या ऑपरेशन ऑल आउट दरम्यान मोठी कारवाई करत तीन पिस्टल, सहा जिवंत राऊंड, अवैध दारू आणि मोठ्या प्रमाणात चोरीचे साहित्य जप्त केले आहे. याशिवाय दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली असून, 41 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
धुळे तालुका पोलिसांनी गुजरात राज्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करताना दोन गाड्या थांबवल्या. झडतीदरम्यान या गाड्यांमध्ये लोखंडी तलवार, टॉमी आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील नवलाखुबे येथील विशाल सुखदेव जाधव, वेताळ गावातील कुणाल रोहिदास बोंबले, राजगुरुनगर मधील पियुष शैलेंद्र खांगटे, कर्जत तालुक्यातील साहिल रमेश लाड, नवी मुंबईतील कलीम शेख आणि सतीश राम तायडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर IPC कलम 310, 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव रोड पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेत असताना सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल आणि विजय गायकवाड यांनी पोलिसांवर मिरची पूड टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पिंजारीवर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 41 गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्याकडे पिस्टल सापडली आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नरडाणा हद्दीत नाकाबंदी दरम्यान विजय गंगाराम राजपाल आणि रोहित लालचंद रोहिडा यांच्या ताब्यातून चार लाख 87 हजार रुपयांच्या हरियाणा निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला.
वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या सात जणांवर 70 हजार रुपयांचा दंड आकारला, तर वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 253 जणांवर एकूण 1.20 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
ऑपरेशन दरम्यान 3270 लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली, तसेच जुगार खेळणाऱ्या 11 जणांवर कारवाई करत 8100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या ऑपरेशन ऑल आउट मोहिमेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे आणि विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी सहभागी होते.