धुळे : वडिलांनी घरात राहू नये, यामुळे रागावून डोक्यात लाकडी दांडका घालून खून करणाऱ्या नराधम मुलाला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराडी गावात घडली. सिंगा तुमडु पावरा (वय ७०) आणि त्यांचा मुलगा सुनिल सिंगा पावरा (वय ३०) हे दोघे एकत्र राहत होते. घरात राहण्यावरून वडील आणि मुलामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरू होता.
रविवार (दि.१) रोजी सकाळी ११.३० वाजता, सुनिल याने घरात झोपलेल्या आपल्या वडिलांना प्रथम शिवीगाळ केली आणि नंतर रागाच्या भरात लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारले. यात वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत सिंगा पावरा यांचा दुसरा मुलगा आमावश्या सिंगा पावरा याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुनिल सिंगा पावरा याला अटक केली असून मिलिंद पवार हे पुढील तपास करत आहेत.