धुळे : शहरातील कुख्यात गुंड सत्तार मासूम पिंजारी ऊर्फ ‘सत्तार मेंटल’ याला महाराष्ट्र प्रतिबंधक धोरणात्मक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एका वर्षासाठी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सध्या कुख्यात गुंड सत्तार मासूम पिंजारी ऊर्फ ‘सत्तार मेंटल’ हा मोक्का गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करता, तो समाजासाठी गंभीर धोका ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
सार्वजनिक सुव्यवस्था व शांततेस धोका निर्माण करणाऱ्या गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यांशी संबंधित गुन्हेगार, व्हिडीओ पायरेट्स, वाळू तस्कर तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 1981 मध्ये एमपीडीए कायदा अस्तित्वात आणण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत सत्तार पिंजारीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक धिवरे यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना दिले होते. त्यांनी उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्यामार्फत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.
सत्तार पिंजारीने 2006 पासून गुन्हेगारी कारकीर्द सुरू केली असून तो अद्याप सक्रिय आहे. त्याच्यावर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 16, 17, 20 आणि 22 अन्वये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेक वेळा नागरिकांना दमदाटी करत परिसरात दहशत निर्माण केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रस्तावाची तपासणी करून कायदेशीर तरतुदींची पडताळणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी एमपीडीए कायद्याच्या कलम 3(1) अन्वये सत्तार पिंजारी यास नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे यांच्या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सत्तार पिंजारी यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.