धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात एका कॅफेच्या बाहेर दिवसाढवळ्या जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात शाहरुख शहा (रा. मोगलाई परिसर) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवार (दि.13) रोजी सायंकाळी शंभर फुटी रस्त्यावरील अमन कॅफेजवळ ही घटना घडली. शाहरुख शहा व काही महिन्यांपूर्वी त्याच्याशी वाद झालेल्या चार ते पाच युवकांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. वाद मिटवण्यासाठी शाहरुख कॅफेजवळ गेला होता, मात्र त्यांच्यातील वाद सुटण्याऐवजी चिघळला.
जुन्या वादातून गोळीबारा दरम्यान एकाने गावठी पिस्तुलातून शाहरुखच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या, यापैकी एक गोळी त्याला लागली. तो गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, याच गडबडीत हल्लेखोर पसार झाले.
जखमीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, जवळच असलेल्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात दोन महिन्यांपूर्वीही गोळीबार झाला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.