धुळे : मागील भांडणाच्या कुरापतीवरून भरदिवसा गोळीबार करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने अटक केली. या दोघांची परिसरात दहशत असल्याने पोलिसांनी त्यांची धिंड काढून नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण केला.
शंभर फुटी रस्त्यावरील अमन कॅफेजवळील घटनेत, शाहरुख बाबु शाह (रा. साखळी रोड) हा आपल्या मित्रासोबत चहा प्यायला असताना, आरोपी बिलाल सुबराती शाह (रा. काझी प्लॉट) याने गावठी कट्ट्याने गोळीबार केला. तसेच हाशिम मलक अब्दुल रहेमान (रा. मिल्लत नगर) याने शाहरुखवर हल्ला केला. गोळीबारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि पोनि सुरेशकुमार घुसर घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात बी. एन. एस. कलम १०९, ३५१(२) आणि भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी फरार होते, मात्र पोलीस अधीक्षक धिवरे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
सुनिल पाथरवट, अविनाश वाघ, शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, विनोद पाठक, देवेंद्र तायडे व सिराज खाटीक यांच्या पोलीस पथकाने दोघांना अटक केली. बिलालकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
बिलाल व हाशिम या आरोपींची आझाद नगर, काझी प्लॉट, मिल्लत नगर व वडजाई रोड परिसरात दहशत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या भागांतून त्यांची धिंड काढली. नागरिकांनी गुन्हेगारांच्या भीतीला बळी न पडता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.