आशीष शिंदे, कोल्हापूर
कंपनीच्या खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्याची जबाबदारी नेहमीच प्रतीकवर असायची. तो सावध, जबाबदार आणि अनुभवी कर्मचारी होता. एका सकाळी त्याला अचानक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉल आल्याचे नोटिफिकेशन आले. कॉल रिसिव्ह करताच स्क्रीनवर परिचित चेहरे दिसले. बॉस, फायनान्स हेड आणि दोन सहकारी. सगळे गंभीर मुद्रेत बसलेले. ‘प्रतीक, प्रोजेक्टसाठी तातडीने पेमेंट करायची आहे’, असे बॉसने व्हिडीओ कॉलवर सांगितले.
प्रतीकला काही संशय आला नाही. तो आवाज, ती बॉडी लँग्वेज, ऑफिसमधल्या त्या छोट्या टेबलावर ठेवलेली कॉफीची कप, सगळे अगदी खरेखुरे वाटत होते. मीटिंग संपेपर्यंत तो पूर्णपणे खात्रीबद्ध झाला की ही खरीच व्हिडीओ कॉन्फरन्स मिटींग आहे. निर्देश मिळाल्याबरोबर त्याने काही मिनिटांत पाच लाख रुपये कंपनीच्या खात्यातून दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केले.
दोन तासांनी खऱ्या बॉसचा फोन आला. ‘प्रतीक अरे कोणते पेमेंट केले तू हे?’ त्या क्षणी त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. ज्यांच्याशी तो व्हिडीओ कॉलवर बोलला होता, ती सगळी माणस एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवलेले डीपफेक चेहरे होती! आवाज, भाव, बोलण्याची ढब, अगदी ऑफिसच्या पार्श्वभूमीपर्यंत सर्वकाही कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले.
या सापळ्याला ‘डीपफेक व्हिशिंग’ म्हटले जाते. एआयचा वापर करून हुबेहूब आवाज, बोलण्याची पद्धत, चेहरा, हावभाव जसेच्या तसे केले जातात. कंपनीच्या ईमेल सर्व्हरची माहिती आधीच मिळवली जाते. त्यावरून व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण पाठवून मीटिंगचे वातावरण तयार केले जाते आणि गंडा घातला जातो. केवळ कंपनीच्या कार्यालयांचीच नव्हे तर अशा प्रकारे अनेकांना धमकी देऊन देखील सायबर चोरटे गंडा घालत आहेत.
यापासून बचावासाठी सर्वात महत्वाचा नियम एकच. समोरच्या व्यक्तीचे ऐकून लगेच त्यावर विश्वास ठेवू नका, पडताळणी करा. जर फोनवर कुणी पैसे पाठव, मी बॉस बोलत आहे, असे आदेश देत असेल किंवा तातडीचा काही आग्रह करत असेल, तर ओळखीचा आवाज असला तरीही एकदा खात्री करा. अशा संशयास्पद कॉलनंतर त्वरित स्क्रीनशॉट/कॉल लॉग आणि सर्व संबंधित संदेश सेव्ह करा, लगेच बँकेला कळवा आणि कंपनीच्या सिक्युरिटी टीमला रिपोर्ट करा किंवा स्थानिक सायबर सेलला त्वरित तक्रार नोंदवा.