नाशिक : माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील संशयित दीपक सुधाकर बडगुजर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. 30 जानेवारीला या प्रकरणात सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत दीपक बडगुजर यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अंतिम सुनावणीनंतर जामीनाचा निर्णय होणार आहे.
सिडकोतील उपेंद्रनगर परिसरात 14 फेब्रुवारी 2022 रोजी अज्ञातांनी ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणात पोलिसांनी तपास करीत सुमारे अडीच वर्षांनंतर आकाश आनंदा सूर्यतळ (24, रा. नाशिकरोड), श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या, सनी पगारे उर्फ टाक्या (दोघे रा. जेतवननगर, उपनगर), लक्ष्मण शेवाळे (33, रा. सिडको), प्रसाद संजय शिंदे (29, रा. नांदूरगाव), मयूर बेद या संशयितांना अटक केली.
चौकशीदरम्यान, शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याचाही सहभाग समोर आल्याने पोलिसांनी या गुन्ह्यातील सातवा संशयित म्हणून दीपक बडगुजर याचेही नाव गुन्ह्यात समाविष्ट केले. या गुन्ह्यात दीपक यास न्यायालयाने सशर्त जामीन दिल्याने ते जामीनावर आहे. दरम्यान, या गुन्ह्यात संशयितांविराेधात मकोका नुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील सहा संशयितांना मकोका नुसार अटक करण्यात आली तर दीपक याचा जामीन रद्द करावा या मागणीसाठी शहर पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांना पुरावे सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार असून, तोपर्यंत पोलिसांनी दीपकवर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.