एक नामांकित आयटी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करणारा आदित्य. त्याला तंत्रज्ञानाचे उत्तम ज्ञान होते. मात्रा अचानक एकेदिवशी दुपारी, आपल्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. ‘नमस्ते, मी अनंत बोलतोय, तुमच्या बँकेच्या फ्रॉड विभागातून. आमच्या सिस्टममध्ये तुमच्या खात्याशी संबंधित संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत. कृपया काही क्षण द्या आम्ही तपशील तपासू’!
हे ऐकतात आदित्यला आश्चर्य वाटले, पण बँकेकडून आलेला कॉल असल्याने त्याने ऐकण्याचे ठरवले. इकडच्या तिकडच्या बँकेच्या गोष्टी सांगून समोरचा व्यक्ती म्हणाला, ‘आम्ही तुमच्या खात्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक ओटीपी पाठवणार आहोत. तो ओ टी पी तुम्ही आम्हाला सांगू नका. कृपया तुम्हाला येणारा पुढील कॉल आमच्यासोबत मर्ज करा, ज्यामुळे आमचा वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील’.
आदित्यने हे मान्य केले. काही क्षणांतच त्याला वेटिंग वर एक कॉल आला, वेटिंग वर आलेला कॉल उचलताच, त्याचे खाते रिकामे झाले. सध्या सुरू असलेल्या कॉल मर्ज या सायबर सापळ्याची माहिती देण्यासाठी या पात्रांचा आधार घेतला आहे.
सध्या सायबर चोर इतके हायटेक झाले आहे की, ते ना आता तुम्हाला कोणतीही लिंक ओपन करायला सांगतील, ना ओटीपी सांगा म्हणतील. सध्या सायबर कोट्यांकडून गंडा घालण्यासाठी कॉल मर्ज या नव्या सापळ्याचा वापर केला जात आहे. यामध्ये तुम्हाला एखाद्या चोरट्याचा कॉल येतो व तो सांगतो वेटिंग वर असलेला कॉल उचला, त्याला लाईनवर घ्या, कोणती ना कोणती नवी शक्कल, कोणता ना कोणता बहाना बनवून हे सायबर चोरटे तुम्हाला वेटिंग वर आलेला कॉल उचलण्यास भाग पाडतील. वेटिंग वर आलेला कॉल हा तुमच्या ओटीपी संदर्भात असतो. ओटीपी ऐकताच दोन्ही कॉल कट होतात. सध्या अशा प्रकारे लोकांना गंडा घातला जात असल्याने एनपीसीआय ने असे कॉल मर्ज करू नका अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वेटिंग वर आलेला कोणताही कॉल उचलण्याआधी एकदा नक्की विचार करा.
कधीही अनोळखी कॉल मर्ज करू नका. कोणीतरी तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून आता एक कॉल येईल, तो मर्ज करा असे सांगेल. तर तो स्कॅम आहे हे समजा.
ओटीपी कुणालाही देऊ नका, ऐकवूही नका. बँका, यूपीआय सेवा, किंवा सरकारी संस्था कधीही फोनवर ओटीपी विचारत नाहीत.
कॉलवर ‘धोका’ ओळखायला शिका. तुमचं अकाउंट बंद होईल, आता लगेच काही करा असा दबाव टाकणार्या फोन पासून सावध राहा. फसवणूक झालीच तर ताबडतोब सायबर क्राईम हेल्प नंबर 1930 वर कॉल करा.