दिलीप भिसे, कोल्हापूर
प्रत्यक्षात डाऊनलोड न करताही काही अॅप आपल्या मोबाईलमध्ये येतात. चोरपावलांनी येणार्या अॅपद्वारे आपण वापरत असलेल्या मोबाईलमधील नंबर, मेसेज, फोटोपासून अगदी आर्थिक उलाढालीचीही इत्थंभूत माहिती घेतली जाते आणि या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार गोपनीय माहितीवर कब्जा करीत बेधडक गंडा घालत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांतही सुरक्षित ठेवलेल्या कोट्यवधींच्या धनराशीवर सायबर गुन्हेगार बिनधास्त दरोडे घालत आहेत. अलीकडच्या काळात सायबर टोळ्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्राला टार्गेट करून कोट्यवधीची लूट सुरू केली आहे. सायबर टोळ्यांचे फोफावणारे आव्हान पोलिस, सायबर यंत्रणा रोखणार का?
सायबर भामट्यांनी पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वयोवृद्ध, विशेष करून उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झालेल्या अधिकार्यांना टोळ्यांकडून टार्गेट करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात वयोवृद्धांना वेगवेगळी आमिषे दाखवून, प्रसंगी दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा आरोप करून डिजिटल अरेस्टची भीती घालून संबंधितांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत. वयोवृद्ध असलेल्या कोल्हापुरातील निवृत्त प्राध्यापिका आणि निवृत्त अभियंत्यांना सायबर भामट्यांकडून 11 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सोशल मीडियाद्वारे फेक लिंक, मेसेज, डमी अॅप पाठवून बँकांतील खात्यासह आर्थिक उलाढालीची माहिती घेतली जाते. बहुतांशी वेळा आपल्याकडून नकळत अथवा गेम अॅपद्वारे काही संशयास्पद व घातक अॅप मोबाईलमध्ये शिरकाव करतात. स्क्रीनवरून मेसेज, अॅप डिलिट करण्याचा प्रयत्न केला तरी ते मेल अकाऊंटला जोडले जाऊ शकतात. त्याचा फायदा उठवत सायबर भामट्यांकडून लुबाडणुकीचे फंडे सुरू होतात.
कोल्हापूर जिल्ह्यात शहर, ग्रामीण भागातही याच पद्धतीने ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सहा-सात महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सायबर क्राईम सेलसह पोलिस ठाण्यांकडे अडीच हजारांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. 25 ते 28 कोटींची फसवणूक झाली आहे. यापैकी तीन कोटीहून अधिक रक्कम गोठविण्यात आली आहे. 65 ते 70 लाखांची रक्कम परत मिळविण्यात तपास यंत्रणा यशस्वी ठरल्या आहेत, हे विशेष.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात लष्करासह शासकीय-निमशासकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. पोलिस यंत्रणा अथवा लष्करातील अधिकार्यांच्या नावांचा वापर करून त्यांच्या नावे संपर्क साधला जातो. स्वस्तात वस्तूंचे आमिष दाखविण्यात येते. क्यूआर कोड मोबाईलवर पाठवून एक रुपया खात्यावर पाठविण्याची विनंती केली जाते. त्यानंतर मोठ्या रक्कमेचा गंडा घातला जातो. शहरासह ग्रामीण भागात या पद्धतीने फसवणुकीच्या रोज घटना घडत आहेत.
कोल्हापुरातील निवृत्त प्राध्यापिका आणि निवृत्त अभियंत्याची पुण्यासह धाराशिव व नाशिक येथील एकाच सराईत टोळीकडून 11 कोटींची लूट झाल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. तपास पथकाने पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.याशिवाय अजूनही तीन संशयितांची चौकशी सुरू आहे. गुन्ह्याची पद्धत, धमकी, डिजिटल अरेस्टची भीती, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या नावाचा वापर करून त्यांचा हुबेहूब आवाज, पोलिस ठाण्यांसह ईडी, सेबी कार्यालयाचा सेटअप हे सारे कारनामे नियोजित कटाचाच एक भाग आहे. टोळीची व्याप्ती आणि लुटमारीचे फंडे लक्षात घेता पोलिसांच्या तपासाची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता आहे.