आपण पोलिस, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून व्हिडीओ कॉल करायचा आणि समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यातून लाखो रुपये उकळण्याच्या सायबर भामट्यांच्या जाळ्यात सर्वाधिक उच्चशिक्षित, नोकरदार अडकत असल्याचे काही प्रकरणांवरून स्पष्ट होत आहे. समाजात आपली प्रतिष्ठा जाईल, म्हणून अनेकांनी वर्षभरानंतर पोलिसांत तक्रार दिल्या. खालील प्रमुख तीन प्रकरणे पाहिली तरी सर्वसामान्यांचे डोके चक्रावून टाकणारी आहेत.
प्रकरण 1 :
उद्योग संचालनालय मुंबई येथून अतिरिक्त उद्योग संचालक या पदावरून २०२० मध्ये निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला सायबर भामट्यांनी तब्बल दोन महिने डिजिटल अरेस्ट ठेवले होते.
पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून त्यांच्याकडून ३० लाख रुपये उकळले. सीबीआय, मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याची ओळख सांगितली. डीसीपी मुंबई क्राईम ब्रँच या नावाने व्हॉटस्अॅप कॉल करून मुंबईच्या नेत्याला अटक केल्याचे फोटो दाखविले.
सीबीआयचा लोगो पाठविला. त्यानंतर वेगवेगळ्या सहा ते सात नंबरवरून कॉल सुरू झाले. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपास पूर्ण होईपर्यंत काही दिवस त्यांच्यापासून वेगळे थांबा, असे सांगितले. त्यामुळे घाबरून तो निवृत्त अधिकारी तब्बल दोन महिने हॉटेलमध्ये मुक्कामी राहिला. सायबर भामट्यांच्या धमकीला घाबरून त्यांनी ३० लाख ४० हजार रुपये भामट्याना पाठविले.
प्रकरण 2 : एका बँकेच्या मनी लाँडरिंग केसमध्ये सहभाग असल्याचे सांगून भामट्यांनी थेट भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहायक अधीक्षकालाच पाच दिवस डिजिटल अरेस्ट ठेऊन ११ लाख ९९ हजार रुपये उकळले.
मुंबई क्राईम ब्रँच येथून बोलत असल्याचे सांगून भामट्याने तुमच्या एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून १ लाख ६८ हजाराचे ट्रॅन्जेक्शन झाले आहे. बँकेच्या फ्रॉड केसमध्ये तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेली आहे, असे सांगितले.
त्या अधिकाऱ्याने भीतीपोटी भामट्याला पैसे पाठविले. त्यानंतर पुन्हा त्यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल नंबरवरून व्हॉटस्अॅप कॉल केले. त्या अधिकाऱ्याने चक्क भामट्यांना ११ लाखांचे आरटीजीएस केले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याचे डोळे उघडले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
प्रकरण 3 : सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाला पार्सलमध्ये विदेशी चलन, अमली पदार्थ असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांत १६ कॉल, सीबीआयचे बनावट पत्र पाठिवले.
तुमच्या आधार कार्डचा उपयोग मोहम्मद असलम नवाब मलिक याच्या विरुद्ध पीएमएलए कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात असल्याचे सांगितले. व्हिडीओ कॉलद्वारे सर्व्हेलन्समध्ये राहण्यास सांगितले. मात्र, त्यांना शंका आल्याने त्या निवृत्त डीवायएसपीने भामट्यांची चलाखी ओळखली आणि बँक डिटेल्स देण्यास नकार दिला. तेव्हा प्लॅन फसल्याचे कळताच भामट्यांनी त्यांना शिवीगाळ केली.