आशिष शिंदे, कोल्हापूर
सुनंदा या निवृत्त शिक्षिका. पेन्शनच्या पैशांवर त्यांचे घर चालते. एक दिवस त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला, तुमचे पेन्शन खाते अपडेट करायचे आहे. कृपया खालील लिंकवर क्लिक करून भीम गव्हर्न्मेंट हेल्पडेस्क अॅप डाऊनलोड करा; अन्यथा खाते तात्पुरते गोठवण्यात येईल.
असा मेसेज पाहून सुनंदा यांनी चटकन लिंकवर क्लिक केले. अॅप डाऊनलोड केले. अॅपही अगदी खर्या खुर्या सरकारी अॅपसारखेच दिसत होते. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ओटीपी आणि यूपीआय पिन विचारण्यात आला. सरकारी अॅपसारखेच अॅप दिसत असल्याने त्यांनीही न विचार करता चटकन सगळी माहिती भरून सबमिट बटनवर टच केले केले.
सबमिट बटनवर टच करताच बघता बघता त्यांच्या खात्यातून मिनिटा मिनिटाला पैसे कट होऊ लागले. काही मिनिटातच त्यांचे खाते रिकामे झाले. आता हा गंडा घातला कसा? तर, सध्या सायबर चोरटे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून सरकारी अॅप्स, संकेतस्थळे क्लोन करत आहेत. म्हणजेच अगदी हुबेहूब तशीच दिसणारी अॅप्स आणि संकेतस्थळे हे सायबर चोरटे बनवतात. देशभरात या प्रकारे अनेकांना गंडा घातला जात आहे.
सायबर चोरटे सरकारी किंवा बँकिंग नावाचा वापर करून बनावट अॅप्स, संकेतस्थळे तयार करतात. अशा अॅप्सची लिंक एसएमएस, व्हॉटस्अॅप, ईमेल किंवा सोशल मीडियावर पाठवली जाते. त्यात खाते क्रमांक, आधार, ओटीपी, यॅपीआय पीन अशी संवेदनशील माहिती भरायला सांगितली जाते. माहिती भरताच समोरच्याचे खाते रिकामे केले जाते.
अशा फेक एआय जनरेटेड अॅप्स पासून वाचण्यासाठी मेसेजवर किंवा व्हॉटस्अॅपवर अनोळखी नंबरवरून आलेली कोणतीही लिंक क्लिक करू नका. सरकारी किंवा बँकेची अॅप्स केवळ गुगल प्ले स्टोअर वरूनच डाऊनलोड करा. कोणालाही यूपीआय पिन, ओटीपी किंवा बँक तपशील सांगू नका. अगदी सरकारी अॅपसारखे अॅप असले तरीही अशी गोपनीय माहिती खात्री केल्याशिवाय शेअर करू नका. बँक किंवा सरकारी संस्था कधीही अशाप्रकारे फोन करून किंवा लिंक पाठवून माहिती मागवत नाहीत. अशी फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर फोन करा व तक्रार नोंदवा.