वासनांध नराधम! 
क्राईम डायरी

Crime Diary : वासनांध नराधम!

डोक्यात दगड घालून तरूणीचा खून

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे, पुणे

वीस वर्षांची पूनम एका मेडिकलमध्ये काम करून आपल्या कुटुंबीयांना हातभार लावत असे. कामावरून सुटल्यानंतर ती रस्त्याने घराकडे चालत निघाली होती. नेहमीच पायाखालचा रस्ता असल्याने ती बिनधास्त होती. मात्र, एका वासनांध सैतानाची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न केला. त्याने झडप घालताच कोमलने जोरात प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्याला आपला डाव काही मार्गी लागत नसल्याचे लक्षात येताच डोक्यात दगड घालून त्याने पूनमचा खून केला. अवघ्या काही तासात हा प्रकार घडला होता. तरुणीचा अशाप्रकारे खून झाल्याने उरूळी-कांचन पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली होती...

कोरेगाव मूळ येथे कुटुंबीयांसोबत राहणारी पूनम ठाकूर उरूळी-कांचन येथील एका औषध विक्रीच्या दुकानात काम करत होती. त्यासाठी तिला दररोज मुख्य रस्त्याला उतरल्यानंतर घराकडे जाणार्‍या रस्त्याने पायी प्रवास करावा लागत असे. हा रस्ता थोडासा निर्जन आहे. मंगळवारी (दि. 14) नेहमीप्रमाणे ती कामावर आली होती. काम संपल्यानंतर ती घराकडे चालली होती. त्यावेळी सायंकाळचे सात वाजले असतील. पूनम एकटी रस्त्याने चालत असताना, तिला एकाने पकडण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या मावसभावाला फोन करून आपल्या भावाला फोन करून सांग, असे सांगितले. तिच्या भावाने फोन केला तर पूनमचा मोबाईल बंद लागला. पूनमसोबत काय झालं हा विचार तिच्या नातेवाईकांच्या मनात सुरू होता. तिचं ओरडणे आणि मोबाईल बंद होणं हे त्यांच्या मनाची चिंता वाढविणारे होते. पूनमच्या घरच्यांना तिचा घरी चालत येण्याचा नेहमीचा रस्ता माहिती होता. त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच उरूळीकांचन ते नायगाव रोडवरील प्रयागधाम हॉस्पिटलच्या जवळील गगन कांचन सोसायटीकडे जाणार्‍या रोडलगत तिचा मृतदेह मातीच्या ढिगार्‍यावर पडलेला दिसून आला. डोके रक्ताने माखलेले होते. जमिनीवरही रक्त पडलेले होते. तिचा मोबाईल, सॅक, चप्पल तेथेच पडली होती. एकंदर पाहता पूनमचा खून झाला होता.

एका तरुणीचा सायंकाळच्या वेळी असा खून झाल्याने उरुळी कांचन परिसरात एकाच खळबळ उडाली होती. दरम्यान, खुनाची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. पूनमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. डोक्यात वार करून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सात वेळा तिच्या डोक्यात मारण्यात आले होते. घटनास्थळी पडलेले तिचे साहित्य पाहून नक्कीच तिचा खून चोरीच्या उद्देशाने तर करण्यात आला नव्हता. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

संवेदनशील गुन्हा असल्याने पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केली. परिसरातील 70 ते 80 ठिकाणी असलेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जवळपास 200 ते 250 नागरिकांकडे चौकशी केली. 14 ऑक्टोबर रोजी नायगाव रस्त्याने एक संशयित दुचाकीवरून निघाला होता. चित्रीकरणात संशयित दुचाकीस्वार आढळून आला होता. तसेच पोलिसांना खून झालेल्या ठिकाणी एक बूट सापडला होता. दुचाकीवरील त्या संशयित व्यक्तीच्या पायात देखील तसाच बूट होता. आता काहीतरी धागा पोलिसांच्या हाती लागला होता. परंतु, पोलिस अजून खुन्यापासून लांब होते. सीसीटीव्ही चित्रीकरण पाहताच त्याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीने हा व्यक्ती दिनेश पाटोळे असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी पाटोळेला ताब्यात घेतले. तो काही आपले तोंड उघडायला तयार नव्हता, शेवटी पोलिसी खाक्यापुढं तो काही जास्त वेळ टिकला नाही. रस्त्याने एकटी निघालेली पूनम पाहून त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने विरोध करताच तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पाटोळे याने दिली.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजिगरे, दत्ताजीराव मोहिते, उपनिरीक्षक अमित सिदपाटील यांच्या पथकाने पूनमच्या खुनाचा छडा लावत आरोपी दिनेश पाटोळे याला अखेर बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT