क्राईम डायरी

क्राईम डायरी : ओव्हरअ‍ॅक्टिंग | पुढारी

Pudhari News

-सुनील कदम, कोल्हापूर

साधारणत: साठच्या दशकातील ही घटना आहे. आज सातारा जिल्ह्यात असलेला मायनी परिसर त्यावेळी सांगली पोलिसांच्या हद्दीत येत होता. एकेदिवशी सांगली पोलिसांना सांगावा आला की मायनीजवळ असलेल्या एका खेडेगावातील इनामदार नावाच्या एका बागायतदार तालेवाराच्या सात वर्षांच्या सदाशिव नावाच्या मुलाचा कुणीतरी खून केला आहे. केवळ सात वर्षांच्या लहानग्या पोराच्या खुनाची बातमी ऐकून पोलिसही अचंबीत झाले. त्यामुळे निरोप मिळाल्याबरोबर फौजदार गायकवाड आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन घटनास्थळी हजर झाले.

या इनामदारांची गावापासून थोड्या अंतरावरील शेतात छोटेखानी बंगला होता, त्याच्या आसपास गावातीलच आणखी काही शेतकर्‍यांची घरे आणि रानातील दहा-बारा वस्त्या होत्या. या वस्त्यांपासून जवळच पिंपळाचे टेक नावाची एक टेकडी होती आणि या टेकडीजवळून एक ओढा वाहत होता. या ओढ्याच्या काठी सदाशिव या लहानग्याचा मृतदेह पडला होता. मृतदेहाचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला दिसत होता, त्यावरून कुणीतरी अमानुषपणे त्याचा खून केल्याचे दिसून येत होते. फौजदार गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा करून आजुबाजूच्या परिसराची तपासणी सुरू केली. त्यावेळी घटनास्थळापासून साधारणत: हजार-पाचशे फुटांवर त्याच ओढ्याच्या काठी एक दुरडी (वेतापासून बनवलेली टोपली) आढळून आली. या दुरडीत एक काळे कापड अंथरण्यात आले होते, त्या कपड्यावर हळदी-कुंकवात माखलेले तान्ह्या मुलांना घालतात तसले अंगडे-टोपडे, एक काळी बाहुली, सुया टोचलेले काही लिंबू, बिबे अशा काही वस्तू मिळून आल्या. विशेष म्हणजे त्यातील अंगड्या-टोपड्यावर मानवी रक्त शिंपडल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी तर्काने जाणले की हे रक्त निश्‍चितपणे सदाचे असले पाहिजे आणि एकूणच हा नरबळीचा प्रकार असावा. त्या अनुषंगाने पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा निश्‍चित केली आणि आपला मोर्चा इनामदारांच्या वस्तीकडे वळविला.

तोपर्यंत सगळ्या वस्तीवर, गावात आणि इनामदारांच्या पै-पाहुण्यात ही बातमी पसरली होती आणि शे-दोनशे बाया-बापड्यांसह शे-पाचशे लोकांची गर्दी झाली होती. आया-बायांनी एकच आकांड-तांडव सुरू केला होता. इनामदारांची कुणाशी वैर-दुश्मनी असल्याचे दिसून येत नव्हते, त्यामुळे कोणत्यातरी इच्छापूर्तीसाठी कुणीतरी अघोरीमार्गाच्या आहारी जाऊन हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. पोलिसांच्या या ताफ्यात तुकाराम टोमके नावाचा एक इरसाल हवालदार होता. गड्याची नजर नुसती घारीसारखी भिरभिरत असायची आणि त्याची ही नजर नेमकं काहीतरी हेरायची. बाया-बापड्यांची उर बडवून रडारड सुरू होती आणि टोमके ही रडारड बारकाईनं न्याहाळत होता. या सगळ्या बायकांच्या गराड्यात एका बाईने जरा जास्तच आकांत मांडलेला दिसत होता, मयत झालेल्या पोराच्या आईपेक्षा तीच मोठ्या आवाजात टाहो फोडताना आणि हाणून-बडवून घेताना, तोंडात बकाका माती कोंबून घेताना आणि शिव्याश्राप देताना दिसत होती. टोमकेला वाटलं की ही बाई सदाच्या जवळच्या नात्यातील असावी आणि मयत सदावर तिचा जास्तच जीव असावा, म्हणून बिचारीला एवढं दु:ख झालं असावं. त्यामुळे टोमकेंनी जमलेल्या लोकांपैकी एकाला बाजूला घेऊन चौकशी केली आणि त्यामधून जी माहिती मिळाली, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळाली. त्या बाईचं नाव वत्सलाबाई होतं, इनामदारांच्या बंगलीपासून जवळच तिच्या सासरची वस्ती होती; पण इनामदार कुटुंबाशी कोणताही नातेसंबंध नव्हता, सात वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं पण अद्याप तिला मुलबाळ झालं नव्हतं, त्यामुळं ती सदाला फार जीव लावत होती आणि सदासुद्धा घरच्यापेक्षा वत्सलाबाईकडेच जास्त रमायचा. मिळालेली एवढी माहिती फौजदारसाहेबांच्या कानावर घालून टोमके पुढच्या तयारीला लागले.

थोड्या वेळाने वत्सलाबाई आपल्या वस्तीकडे निघाली, टोमकेचं तिच्यावर लक्ष होतंच; पण तिच्या चेहर्‍यावर ती मघाशी दाखवत होती त्याप्रमाणे दु:खाचे भाव नव्हते, तर तिच्या चेहर्‍यावर मोठ्या प्रमाणात भीतीचे सावट पसरल्याचे स्पष्ट दिसून येत होते. शंका आल्याप्रमाणे टोमके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गावातून आणि आजुबाजूच्या वाडीवस्तीवरून वत्सलाबाईची माहिती घ्यायला सुरुवात केली तेंव्हा महिमानगड भागात असलेल्या भाना नावाच्या एका देवऋषाकडे तिचे अवसे-पुनवेला जाणेयेणे असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आधी महिमानगडाकडे जाऊन भाना देवऋषाला गाठले. पूर्वी आजच्यासारखी अवस्था नव्हती, नुसता पोलिस बघितला की भल्याभल्यांची तंतरायची, तिथं या भाना देवऋषाचा काय पाड?

 पोलिसांनी काही चौकशी करायच्या आधीच भाना देवऋषाला थोबडायला सुरुवात केली. त्यावेळच्या पोलिसांचा मारसुद्धा त्यावेळच्या पोलिसांना 'साजेसाच' असायचा. भानाच्या नाकातोंडातून रक्ताच्या धारा लागल्या, गालफाडं सुजून टम्म झाली, पेकटातनं धूर निघायला लागला आणि भानाच्या कानाच्या तर केंव्हाच कानठळ्या बसल्या होत्या. काही विचारायच्या आधीच भानानं वत्सलाबाईच्या साथीनं केलेलं पाप कबूल करून टाकलं.

मूलबाळ नसल्यामुळे वत्सलाबाई ठिकठिकाणी देव-देवस्की करत फिरायची, अशीच एकदा तिची गाठ या भाना देवऋषाशी पडली. भानाने तिला खोटेच सांगितले की तिच्या घराण्यात एक जबरदस्त दोष असून एका लहान मुलाचा बळी  दिल्याशिवाय तिला मुलबाळ होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे त्यासाठी खर्चसुद्धा फार येईल. पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेने वत्सलाबाईने मागेपुढे न बघता काही दागदागिने मोडून भानाला पैसे दिले. त्यानुसार भानाने नरबळीसाठी तिला एक मुहूर्त सांगितला. त्यादिवशी तिन्हीसांजेच्या वेळेस भाना ओढ्याकाठी दबा धरून बसला, नेहमीप्रमाणे सदा वत्सलाबाईच्या घरातच खेळत होता. वत्सलाबाईने सगळ्यांचा डोळा चूकवून सदाला ओढ्याच्या दिशेला नेले आणि सराईत कसायाप्रमाणे भानाने त्याचा गळा सोडवला. वत्सलाबाई नावाची ही 'पुतनामावशी' हे अघोरीकर्म उघड्या डोळ्यांनी पाहात होती. थोड्या वेळाने भानाने आणि तिने अन्य पूजाविधी उरकला आणि दोघेही आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले. रात्री सदाच्या घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केल्यावर सदा दुपारीच आपल्या घरातून गेल्याचा तिने कांगावा केला. रात्रभर सदाचे नातेवाईक सदाला शोधत होते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हा प्रकार चव्हाट्यावर आला. विशेष म्हणजे ही बातमी वाड्या-वस्त्यांवर पसरल्यानंतर सगळ्यात आधी बोंब मारत आली होती ती वत्सलाबाईच. आपलं कुकर्म लपविण्यासाठी आणि कुणाला आपली शंका येऊ नये यासाठी तिनं 'अफाट नाटक' केलं; पण एका पोलिसाच्या चाणाक्ष नजरेनं तिची ही 'ओव्हरअ‍ॅक्टिंग' हेरली आणि भानासह वत्सलाबाई कारागृहात दाखल झाली. पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेने वत्सलाबाईने हे कुकर्म केले; पण तिला पुत्रप्राप्ती होणे तर दूरच, उलट एका लेकूरवाळ्या मातेचा उभ्या जन्माचा शाप तिच्या वाट्याला आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT