रहस्यमय सुटकेस! file photo
क्राईम डायरी

सुटकेस उघडली अन् परवेझचा मृतदेह दिसताच 'त्याने' ठोकली धूम

पुढारी वृत्तसेवा

सुनील सकपाळ,मुंबई

तो एक भुरटा चोर होता, रेल्वेत तो छोट्या-मोठ्या चोर्‍या करायचा. अशीच एके दिवशी त्याच्या हाताला एक भली मोठी सुटकेस लागली. आता आपले नशीब पालटणार म्हणून बहाद्दराने ती सुटकेस घेऊन पोबारा केला; पण या सुटकेसमध्ये आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे, याचा त्याला थांगपत्ताच नव्हता. सुटकेस उघडून बघताच त्याने धूम ठोकली...

मलिका-ए-हुस्न म्हणता येईल अशी परवेझ आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा नवजवान रेहमत हे बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यात एकमेकांच्या शेजारी होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर जे व्हायचे तेच झाले आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले; पण नेहमीप्रमाणे दोघांच्याही घरच्यांचा या नात्याला विरोध सुरू झाला; पण आजन्म सोबतीच्या आणाभाका घेतलेल्या परवेज आणि रेहमत यांनी सहा महिन्यांनंतर घरातून पळ काढून दिल्लीत जाऊन लग्न केले. लग्न केल्यानंतर रेहमतने परवेझला मुंब्रा येथे आणले आणि तिथे संतोषनगर परिसरातील एका भाड्याच्या घरात दोघे राजा-राणीसारखे राहू लागले; पण हे सुख फार काळ टिकणारे नव्हते.

नवा नवा संसार असतानाही रेहमतचे अधूनमधून बाहेरच मुक्काम पडू लागले, त्यामुळे परवेझच्या मनात संशय शिरला. तिने सखोल चौकशी केली असता तिला समजले की, रेहमतचे रतलाम येथील अर्शिया नावाच्या महिलेशी लग्न झाले असून, तो मुंब्रा येथेच तिच्यासोबत राहत असल्याचे परवेझला समजले. झालं... रेहमतच्या या फसवणुकीवरून आणि त्याच्या पहिल्या लग्नावरून घरात भांडणाचा येळकोट सुरू झाला.

परवेझ ही रेहमतशी त्याच्या पहिल्या लग्नावरून अनेकदा भांडत होत असे. या रोजच्या भांडणाला रेहमत पुरता वैतागून गेला होता. त्यातून तो वैतागून रहमत हा कधी कधी परवेझला मारहाणही करत असे. रोजचे भांडण आणि त्यातून राग विकोपाला गेल्याने रेहमतने परवेझची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

रेहमतने परवेझच्या खुनाचा प्लॅन बनवताना त्याची पहिली पत्नी अर्शियाला काही दिवसांसाठी मध्य प्रदेशमध्ये त्याच्या आईच्या घरी पाठवले आणि परवेझला मुंब्रा येथे अर्शियाच्या घरी नेले. तिथे त्याने त्याचा भाऊ आणि चुलतभावासह परवेझचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिघांनी परवेझचा मृतदेह रेहमतने तयार ठेवलेल्या सुटकेसमध्ये भरला.

रेहमतचा चुलतभाऊ अब्दुल शेखने मुंब्रा स्थानकावरून अंबरनाथ ट्रेन पकडताना सामानाच्या (लगेज) डब्यात सुटकेस टाकली आणि दोन स्टेशन्सनंतर उतरून तो घरी आला. आता परवेझचा खून पचला, अशा आविर्भावात ते होते; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

परवेझचा मृतदेह असलेली ती सुटकेस लोकल ट्रेनमधून अंबरनाथला गेली आणि रेल्वे सीएसटीला परतत असताना एका व्यसनी आणि भुरट्या चोर्‍या करणार्‍या एका व्यक्तीच्या नजरेस ती सुटकेस पडली.

काही मौल्यवान वस्तू मिळतील, या आशेने तो चोर सुटकेससह सँडहर्स्ट रेल्वे स्थानकावर उतरला आणि त्याने खटपट करून सुटकेस उघडली; मात्र आत परवेझचा मृतदेह बघून ती सुटकेस तिथेच टाकून त्याने धूम ठोकली. तो दिवस होता 15 मार्च 2011.

सँडहर्ट रेल्वे स्थानकानजीक एका महिलेचा मृतदेह असलेली बॅग पडलेली बघून प्रवाशांमध्येही खळबळ माजली. एका प्रवाशाने रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाला या सुटकेसबाबत माहिती दिली. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक संशयास्पद सुटकेस असून त्यात बॉम्ब असू शकतो, असे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि सुटकेस उघडली तेव्हा आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनाही धक्काच बसला. (पूर्वार्ध)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT