नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने युवकाला मारहाण झाल्याचा प्रकार येवला शहरातील मिल्लतनगरमध्ये बुधवारी (दि.१९) घडला.
मोहम्मद हुसेन मो. अनिस (२२, रा. बुंदेलपुरा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित पप्या लंगड्या उर्फ साजिद बशीर शेख (रा. पिंजारगल्ली) याने दारुसाठी हजार रुपये मागितले. ते नाकारल्याने शेखने दोन मित्रांच्या मदतीने हुसेनला जावेद जिममागे घेऊन जात मारहाण व दुचाकीचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
नाशिक : भांडण सुरू असलेल्या ठिकाणावरुन मुलाला घेण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना चौघांनी मारहाण केल्याची घटना वऱ्हेदारणा येथील भगवती वजन काट्याजवळ शनिवारी (दि. २२) घडली. शांताराम पवार (४४) यांनी सायखेडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मुलगा वेदांत याला घेण्यासाठी गेले असता संशयित किरण बर्डे, करण बर्डे, दीपक बर्डे, दिनेश सोनवणे यांनी शिविगाळ केली. पवार यांचे बंधू आले असता दोघांना मारहाण झाली. हवालदार गायकवाड हे तपास करीत आहेत.
नाशिक : बाहेरील व्यक्तीने गावात जमिन घेतल्याच्या रागातून टोळक्याने संबंधित शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना नैताळे - गाजरवाडी रस्त्यावर रविवारी (दि. २३) रात्री घडली. जखमी वैभव शिवाजी गाजरे (२६, रा. गाजरवाडी) यांनी निफाड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित महेश बोरगुडे, बापू बोरगुडे यांसह ११ जणांनी त्याला रस्त्यात रोखून, ‘आमच्या गावात जमिन का घेतली. त्या व्यवहाराचे खरेदी खत रद्द कर’ अशी दमबाजी केली. त्यास नकार दिल्याने बॅटने मारहाण झाल्याचा आरोप आहे. हवालदार घोलप हे घटनेचा तपास करीत आहेत.
नाशिक : सकाळी कुटुंबीय कामाच्या गडबडीत असताना चोरट्याने घरात प्रवेश करीत ५५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना ओझरच्या राजे संभाजीनगरमध्ये घडली. ज्ञानेश्वर रुईकर (३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. २४) सकाळी आठ वाजेच्या सुमारास साधारण २२ वर्षीय तरुणाने घरात प्रवेश करुन दागिने चोरुन पळ काढला. हवालदार पाटील हे घटनेचा तपास करीत आहेत.