‘हसीना’ची घुसखोरी! (Pudhari File Photo)
क्राईम डायरी

Crime News | ‘हसीना’ची घुसखोरी!

बंगाली भुतावळीचा आणखी एक कारनामा

पुढारी वृत्तसेवा

राज्यात बांगला देशी घुसखोरांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांत या घुसखोरांनी जणू काही ‘मिनी पाकिस्तान’ची उभारणी केल्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे लवकरात लवकर या घुसखोरांचा निपटारा करण्याची आवश्यकता आहे. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही काही बांगला देशी घुसखोरांनी आपली बिळं तयार केलेली दिसत आहेत. त्यांचे एकेक कारनामे थक्क करणारे आहेत. अशाच एका घुसखोर ‘हसीना’ची ही कहाणी...

सिंदूर ऑपरेशननंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची मोहीम संपूर्ण भारतभर राबवण्यात आली. यावेळी केवळ पाकिस्तानीच नव्हे, तर बांगला देशीदेखील संपूर्ण देशात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे समोर आले. सातारा जिल्ह्यातही ही घुसखोरी झाली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. एक, दोन नव्हे, तर चार लग्नं करून बिनधोकपणे राहणार्‍या ‘हसीना’ या महिलेच्या घुसखोरीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला.

सातार्‍यात बांगला देशी..!

भारत देशात बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍यांची शोध मोहीम सुरू असताना सातारा पोलिसांनीही माहिती काढण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी नागरिकांबाबतची सर्व माहिती मिळाल्यानंतर या चौकशीत फलटण तालुक्यात एक बांगला देशी महिला राहात असल्याची माहिती सातारच्या दहशतवाद विरोधी शाखेतील पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलिस किरण मोरे यांना समजली. त्यानुसार अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली असता पासपोर्ट व गोपनीय माहितीच्या आधारे धागेदोरे मिळाले. अखेर बांगला देशी महिला फलटण तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानंतर तत्काळ त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले.

बोगस कागदपत्रे!

सातारा पोलिसांनी महिलेला हेरल्यानंतर सुरुवातीला तिने भारतीय असल्याचाच आव आणला. कारण तिच्याकडे आधार कार्डसह इतर कागदपत्रे ही भारतीय असल्याचा वरकरणी पुरावा वाटत होती. बोगस कागदपत्रे पाहिल्यानंतर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच अवघ्या पाच मिनिटांमध्ये तिची बोलती बंद झाली. बोगस कागदपत्रे असल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

नोटबंदीमध्ये हसीना आली..!

हसीना या बांगला देशी महिलेकडे पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा सुरू केल्यानंतर ती नोटबंदीच्या काळात म्हणजे 2016 मध्ये भारतात पश्चिम बंगाल मार्गे आली असल्याची माहिती समोर आली. पश्चिम बंगालमधील एका मुकादमाने तिला घरकामासाठी राजस्थान व नंतर उत्तर प्रदेशमध्ये पाठवले. उत्तर प्रदेशमध्ये तिने एकासोबत लग्न केले. भारतातील हा तिचा पहिला पती कामानिमित्त हैदराबाद येथे राहात होता. यामुळे 2020 पर्यंत म्हणजे 4 वर्षे हैदराबाद येथेच हसीनाचा मुक्काम राहिला. मात्र विवाहानंतर हा पती हसीनाला मारहाण करत तिचा छळ करत होता. यामुळे ती वैतागून पुन्हा बांगला देशमध्ये गेली.

तेलंगणाचेही आधार कार्ड

बांगला देशात हसीनाचे खाण्या-पिण्याचे वांदे होऊ लागले. यामुळे 15 दिवसांतच तिने पुन्हा भारतात बेकायदेशीररीत्या परतण्याचा निर्णय घेतला. बोनगा या रेल्वे स्टेशनमधून एका रेल्वे एजंटमार्फत तिने 6 हजार रुपये देऊन प्रवेश मिळवला आणि ती मुंबईत आली. या कालावधीत ती तेलंगणा राज्यातही गेली. तसे तिच्याकडे तेलंगणा राज्याचे आधार कार्ड मिळाले आहे. प्राथमिक माहितीनुसार तिथेही तिने दुसरे लग्न केले. मात्र ते लग्न न टिकल्याने ती पुण्यात आली.

पुणे व्हाया फलटण

पुणे येथे हसीना भाड्याच्या खोलीत राहात होती. तिथे राहात असलेल्या एका महिलेच्या माध्यमातून तिची फलटण तालुक्यातील एकाची ओळख झाली. या ओळखीतून दोघांची पसंती होऊन दोघांनी लग्न केले. 2021 साली हे लग्न झाले असून तेव्हापासून ती फलटण तालुक्यात राहात होती. तिच्याकडे बनावट आधार कार्ड होते. याची फलटण तालुक्यातील या पतीला माहिती नव्हती. सातारा पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एकेक बाजू समोर आल्यानंतर फलटण तालुक्यातील हसीनाच्या पतीला पसीना फुटला. या माहितीमध्ये बांगला देशमध्येही हसीनाचे लग्न झाले असून तिला एक मुलगा असल्याचेही समोर आले आहे. अखेर तिच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तिला पोलिस कोठडी मिळाली आहे. आता न्यायालयाच्या पुढील आदेशाची पोलिस वाट पाहात आहेत. एक तर गुन्हा दाखल असल्याने तिच्यावर त्यानुसार खटला चालवला जाईल किंवा तिची बांगला देशामध्ये रवानगी केली जाईल.

अपनी बिरादरी का आदमी

अनेकवेळा स्थानिक लोकांकडून कळत-नकळतपणे या घुसखोरांचे बस्तान बसविण्यासाठी हातभार लावला जातो. बनावट ओळखपत्रांमुळे हे बंगाली घुसखोर उत्तर भारतीय मुस्लिम बिरादरीचेच वाटतात. परिणामी त्यांना स्थानिकांकडून सर्व ती प्राथमिक मदत मिळत जाते आणि हळूहळू ते इथेच मिसळूनही जातात. पण घुसखोरी केलेले बहुतांश बांगला देशी हे वेगवेगळ्या अवैध व्यवसायाशी निगडित आहेत. अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा हात दिसून येतो. काहींचा तर ‘हुजी’ या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. त्यामुळे केवळ नामसाधर्म्यामुळे कुणालाही ‘अपनी बिरादरीवाला’ म्हणण्यापूर्वी स्थानिकांनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे.

एक अनोखा किस्सा!

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी कफ परेड भागातून माईन हयात बादशहा शेख या 51 वर्षीय बांगला देशी घुसखोराला अटक केली होती. विशेष म्हणजे तो मुंबईत चक्क 34 वर्षांपासून राहात होता. या काळात तो मौलाना म्हणून वावरत होता. वेगवेगळ्या मदरशांमधून लहान मुलांना प्रवचने देत होता. त्याची बायको बांगला देशात राहते तर मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत होता. हा बहाद्दर दरमहा आपल्या बायकोला आणि पोराला बांगला देशी टका या चलनात पैसे पाठवत होता. तब्बल 34 वर्षे हा प्रकार पोलिस किंवा अन्य शासकीय यंत्रणांच्या लक्षातच आला नाही. घुसखोरांच्या बाबतीत शासकीय यंत्रणा किती निद्रिस्त आहे, त्याचा प्रत्यय येतो.

शासकीय लाभार्थी!

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका बांगला देशी घुसखोर महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिच्याकडे असलेल्या बनावट कागदपत्रांवर चक्क हिंदू मराठा नावाचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या महिलेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान तर केलेच होते. पण लाडक्या बहिणीसाठी सरकार देत असलेले पैसेही मिळविले होते. अशाच पद्धतीने राज्याच्या कोणकोणत्या भागात, कोणकोणत्या नावाने बांगला देशी घुसखोर राहात आहेत, याचा थांगपत्ताही नाही. हळूहळू हे शासकीय योजनांचे लाभार्थी बनत आहेत, मतदान करत आहेत, उद्या निवडणुकीतही उतरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT