counterfeit card scam | काऊंटरफिट कार्ड स्कॅम 
क्राईम डायरी

counterfeit card scam | काऊंटरफिट कार्ड स्कॅम

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे, कोल्हापूर

एका आलिशान मॉलमध्ये आदित्य आपल्या कुटुंबासोबत डिनरचा आनंद घेत होता. बिल आले, त्याने खिशातून आपले क्रेडिट कार्ड काढले आणि वेटरकडे दिले. वेटर कार्ड घेऊन गेला, स्वाईप केले आणि कार्ड परत आणून दिले. सगळे काही अगदी नॉर्मल होते; पण आदित्यला माहीत नव्हते की, त्या मॉलच्या गजबजाटात त्याच्या खिशातल्या क्रेडिट कार्डची हुबेहूब प्रतिकृती तयार झाली आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतानाच त्याच्या फोनवर एक मेसेज धडकला, “तुमच्या कार्डवरून दुबईतील एका स्टोअरमध्ये 1,50,000 चा व्यवहार झाला आहे.” आदित्यच्या हातातील चहाचा कप खाली पडला; कार्ड तर त्याच्या पाकिटात सुरक्षित होते, मग ही चोरी झाली कशी?

हा खेळ होता काऊंटरफिट कार्ड म्हणजेच बनावट क्रेडिट कार्डचा. सायबर चोरटे आता केवळ ओटीपी चोरत नाहीत, तर ते चक्कतुमचे कार्डच मॅन्युफॅक्चर करतात. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा दुकानात जेव्हा तुम्ही कार्ड स्वाईप करण्यासाठी देता, तेव्हा चोरटे स्किमर नावाच्या छोट्या यंत्राचा वापर करून तुमच्या कार्डच्या मॅग्नेटिक स्ट्रीपमधील सर्व डेटा चोरतात. हा चोरीचा डेटा नंतर एका कोर्‍या प्लास्टिक कार्डवर चढवला जातो. दिसायला ते कार्ड अगदी तुमच्या कार्डसारखे नसले, तरी तांत्रिकद़ृष्ट्या ते तुमच्याच कार्डची झेरॉक्स कॉपी असते. यालाच ‘कार्ड क्लोनिंग’ म्हणतात.

या सायबर सापळ्याची गंभीरता इतकी आहे की, जोपर्यंत बँक अलर्ट येत नाही, तोपर्यंत तुम्हाला पत्ताही लागत नाही की तुमची लूट झाली आहे. एकदा का चोरट्यांनी हे बनावट कार्ड तयार केले की, ते त्याचा वापर करून महागड्या वस्तूंची खरेदी करतात किंवा अशा ठिकाणी व्यवहार करतात जिथे पिनची गरज नसते. आदित्यच्या बाबतीतही तेच झाले.

काऊंटरफिट कार्ड या सायबर सापळ्यापासून वाचण्यासाठी सतर्क राहणे हाच एकमेव पर्याय आहे. कार्ड स्वाईप करताना ते नेहमी तुमच्या डोळ्यांसमोर असू द्या, कधीही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला कार्ड घेऊन दुसर्‍या रूममध्ये जाऊ देऊ नका. शक्य असल्यास टॅप अँड पे किंवा चिप-आधारित कार्ड वापरा. कारण, ते क्लोन करणे कठीण असते. जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यवहाराचा मेसेज आला, तर सेकंदाचाही विलंब न लावता बँक कस्टमर केअरला फोन करून कार्ड ब्लॉक करा आणि 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT