नाशिक : बिडी कामगार परिसरातील तीन चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणात महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बांधकामासाठी खड्डा खोदताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना न केल्याने अटीशर्थींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत बांधकाम परवानी रद्द का करू नये, यासंदर्भात पाच दिवसात खुलासा करण्याचे या नोटीसीद्वारे सूचित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खोदलेल्या खडड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी. तसेच केलेल्या उपाययोजनेसंदर्भात अहवाल सादर करावा, असे निर्देशही महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकास दिले आहेत.
नाशिक शहरातील बिडी कामगार परिसरात सर्वे क्रमांक २७५ पै. भूखंड क्रमांक ४ या मिळकतीत विहान पार्टनरशिप फर्मच्या माध्यमातून बांधकामाची उभारणी केली जात आहे. यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने ७ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशानुसार बांधकाम परवानगीला मंजुरी दिली आहे. बांधकाम परवानगी पत्रातील अटीशर्थींनुसार तसेच बांधकाम विषयक इतर अनुषंगिक अधिनियमांतील तरतुदींनुसार बांधकाम क्षेत्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे बंधनकारक होत्या. सदर जागेवर सहा ते सात फुटाचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. त्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) उघडकीस आली. सदर घटना अत्यंत गंभीर असून खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यासे सदर जिवितहानीस बांधकाम व्यावसायिक जबाबदार असल्याचे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. बांधकाम परवानगीतील अटीशर्थींचे अनुपालन केले नसल्याने नियमानुसार पुढील कार्यवाही का करण्यात येऊ नये, याबाबत पाच दिवसात खुलासा करावा, असे या नोटीसीत म्हटले आहे. नोटीसीवर कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांची स्वाक्षरी आहे.
सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यास बांधकाम परवानगी पत्रातील अट क्रमांक ३१ व ३३ चा भंग झाला असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६चे कलम ४५ व ६९ तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमांनुसार देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीपत्रातील अटींचे उल्लंघन बांधकामाच्या ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे, असे नोटीसीत म्हटले आहे.
बिडी कामगार नगराजवळील आदर्श शाळेजवळ नव्याने होत असलेल्या द व्हि पार्क या 21 मजली सदनिकेच्या बांधकामाकरिता खड्डा खोदण्यात आला होता. संततधार पावसामुळे या खड्ड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. या खड्याची खोली सुमारे 15 ते 20 फूट आहे. मुलांचे मृतदेह मिळताच कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त रहिवाशांनी विडी कामगार नगर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून बिल्डर विजय लाखालिया यला ताब्यात घेतले.
याप्रकरणी आडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विजय कांतीभाई शेखालीया (रा. सिडको) आणि ठेकेदार आकाश गायकवाड (रा. पवार मळा, पेठ रोड) या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन ताे निष्काळजीपणाचे कारण देत गुन्हा मागे घेण्यात आल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली.
खड्ड्यात पडून मृत पावलेल्या तीनही शाळकरी मुले हे त्यांच्या कुटुंबीयांचे एकुलती एक मुले होती. त्यात एकाला दत्तक घेतले होते. तोच त्यांच्या आई-वडिलांचा वृद्धपकाळातला आधार होता. मात्र या घटनेने या कुटुंबीयांची म्हातारपणातली काठी हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत बिल्डरचा हलगर्जीपणा अधोरेखित होत आहे. त्याने संरक्षण भिंत किंवा सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे आवश्यक होती. त्याला ताब्यात घेतलेले असून कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव, नाशिक
मृत पावलेले साई गरड हा इयत्ता दहावीत तर साई केदारनाथ उगले हा नवनीत असून हे दोघे आदर्श विद्यामंदिरमध्ये शिकत आहे तर साई हिलाल जाधव हा बिटको विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे. सोमवारी (दि.30) त्यांच्या मृत्यूची वार्ता शाळेत धडकतास शिक्षक आणि त्यांच्या मित्रांना जबर धक्का बसला.