छत्रपती संभाजीनगर : कामावर पायी निघालेल्या तरुणीसमोर दुचाकी उभी करून अश्लील हावभाव केले. तरुणीने आरडाओरड करताच नागरिकांनी धाव घेत छेड काढणाऱ्या मवाल्याला बेदम चोप देऊन जवाहर नगर पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार मंगळवारी (दि.१२) दुपारी एकच्या सुमारास विश्वभारती कॉलनीत घडला. खालेद अफिक शेख (३८, रा. बायजीपुरा, इंदिरा नगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
२५ वर्षीय तरुणी रस्त्याने पायी कामाच्या ठिकाणी निघाली होती. रस्त्यात आरोपी खालेद दुचाकीने (एमएच २० एचई २५८६) तिच्या समोर आला. त्याने ओठांवर जीभफिरवत अश्लील हावभाव केले. पीडिताने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने गाडीचा हॉर्न वाजवला. त्यामुळे पीडितेचे पुन्हा
त्याच्याकडे पाहताच त्याने परत अश्लील इशारा केला. घाबरलेली पीडिता तेथून पुढे निघाली. तेव्हा त्याने पाठलाग करत पाण्याच्या टाकीजवळ देखील पुन्हा अश्लील हावभाव केले. त्यामुळे तिने आरडाओरड सुरू केली. परिसरातील नागरिक जमा झाले आणि खालेदला बेदम चोप दिला. त्यानंतर पकडून जवाहर नगर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.