ठळक मुद्दे
इगतपुरीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर सीबीआयचा छापा
सात आलिशान गाड्या, १ कोटीहून अधिक रोकड, सोने, लॅपटॉप, मोबाइल आदी साहित्य जप्त
नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे उकळत फसविले जात असे
इगतपुरी ( नाशिक ) : ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील संशयितांकडून इगतपुरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चालविल्या जात असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर रविवारी (दि. 10) सीबीआय पथकाने छापा टाकून सहा जणांना अटक करत त्यांच्या ताब्यातील सात आलिशान गाड्या, १ कोटीहून अधिक रोकड, सोने, लॅपटॉप, मोबाइल आदी साहित्य जप्त केले आहे. सीबीआयने यासंदर्भातील माहिती एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
संशयितांकडून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधून पैसे उकळत फसविले जात असल्याचे ८ ऑगस्ट रोजी समोर आले होते. या सायबर फसवणुकीविरोधात सहा संशयितांसह काही अज्ञात व्यक्ती तसेच बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात संशयितांकडून काही अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून अनेक लोकांची फसवणूक करण्याचा कट रचल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी 'ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस'नामक एक बोगस कॉल सेंटर बनवून त्यामार्फत संशयितांनी दिशाभूल करणारे कॉल करून मोठी आर्थिक फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यात कारवाईच्या आधारे सीबीआयने रविवारी ही छापेमारी केली.
बोगस कॉल सेंटरमार्फत अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशांतील लोकांनाही गंडा घालण्यात आल्याची बाब समोर आली आहे. संशयितांनी त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स तसेच क्रिप्टो करन्सी नावाखाली अवैध पैसेदेखील उकळले. हे रॅकेट चालवण्यासाठी एकूण ६० ऑपरेटर्सना कंपनीत भरती केले होते. ज्यामध्ये डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे या निवेदनात नमूद आहे.
सीबीआयने टाकलेल्या छाप्यात एकूण ४४ लॅपटॉप, ७१ मोबाइल, १.२० कोटी रुपये रोख, ५०० ग्रॅम सोने आणि १ कोटी रुपये किमतीच्या सात लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर ५ हजार यूएसडीटी क्रिप्टो करन्सी (५ लाख रुपये) आणि २००० कॅनेडियन डॉलर गिफ्ट व्हाउचर (१.२६ लाख रुपये)चे अवैध व्यवहार आढळून आले आहेत.