गणेश गोडसे, बार्शी
चमचमीत जेवणाचा बेत ठरवून, हॉटेलात नेऊन दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या. त्याच रिकाम्या बीअरच्या बाटलीने सुशील नामक दाजीच्या गळ्यावर घाव घालून मेहुण्याने जीव घेतल्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला. चक्क भावानंच बहिणीचं कुंकू पुसलं. बहिणीला विधवा केल्याचा धक्कादायक व तितकाच हृदयद्रावक प्रसंग पत्नीसमोरच घडला आणि एकच खळबळ उडाली.
अलीकडे दिवसेंदिवस व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजची तरुणाई व्यसनाच्या आहारी जाताना दिसून येत आहे आणि या व्यसनाच्या माध्यमातूनच माणसाला दुसर्याचा जीव खूप स्वस्त वाटू लागलाय. पोटात बाटलीतील ‘अक्काबाई’ गेली की, त्या तरुणाईचं धाडस कमालीचं वाढत जातं. बार्शी तालुक्यातील पांगरी गावात असाच प्रकार घडला. भावानेच आपली पत्नी, बहीण व मैत्रिणीसमोर प्यालेल्या बीअरची बाटली फोडून तिचाच धारदार शस्त्र म्हणून वापर करत आपल्याच बहिणीच्या कुंकवाच्या गळ्यावर मारून बदला घेतला आणि आपला प्रेमविवाहाला विरोध होता यावर शिक्कामोर्तब केलं. बहिणीच्या लग्नाला विरोध असलेल्या भावाने अखेर दाजीच्या गळ्यावर वार करून रक्तपात करत त्याचा जीव घेतला.
तालुक्यातील एका गावातील सुशील नावाच्या तरुणाचे लगतच्या जिल्ह्यातील गावातल्या तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांना त्याचे रूपांतर विवाह बंधनात करायचे होते. मात्र, त्या विवाहाला मुलीच्या घरच्या लोकांचा प्रखर विरोध होता. तरीही त्यांनी पुढे त्या तरुणाच्या गावामध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह केला. विवाहाला मात्र त्या तरुणीच्या घरचे कोणीही नातेवाईक उपस्थित राहिले नव्हते. यातूनच त्यांनी आपला त्या विवाहाला विरोध असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
एकच महिन्यापूर्वी सुशील व त्याची पत्नी हे दोघेजण पुणे येथे कामानिमित्त जाऊन तेथेच राहत होते. काही दिवसांपूर्वी सुशील आपल्या पत्नीसोबत आपल्या मावशीच्या घरच्या कार्यक्रमानिमित्त येडेश्वरी येथे आले होते. पत्नीचं माहेर जवळच असल्याने पत्नीच्या आग्रहाखातर सासुरवाडीला जायचे ठरले आणि येथेच घात झाला. सुशील, त्याची पत्नी, सासू-सासरे आणि मेहुणा हृषीकेश असे सगळेजण जेवणासाठी म्हणून पांगरी येथे आले. तेव्हा हो-नाही म्हणणार्या हृषीकेशच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी शिजत होते. पांगरी येते आल्यावर हॉटेलच्या पाठीमागील बाजूच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये मेहुणा आणि दाजीमध्ये सगळे विसरल्याचा आव आणत हृषीकेशने सुशीलला दारू पिण्याचा आग्रह केला. याला मान देत सुशीलनेही बीअर पिण्यास होकार दिला.
दरम्यान, सर्वजण जेवण करत असताना हृषीकेश व सुशील या मेव्हणा व दाजीमध्ये दारू पिताना लग्नाच्या कारणावरून भांडण सुरू झाले. भांडण टोकाला जात असतानाच हृषीकेशने आपल्या मनातला राग बोलून दाखवत बहिणीच्या लग्नाचा विरोध प्रकट केला आणि रागाचा पारा वाढवत त्याने आपल्या हातातील दारूची बाटली बेडवर फोडून फुटलेल्या काचेच्या बाटलीने सुशीलच्या गळ्यावर वार करून त्याचा जीव घेतला आणि आपल्या बहिणीच्या प्रेमविवाहाचा बदला घेतला; पण यामध्ये भाऊ हृषीकेशने चक्क आपल्या बहिणीचेच कुंकू पुसले. हे तो विसरला.