रात्री दहानंतर अचानक व्हॉट्सअॅपवर 'हाय' म्हणून मेसेज येतो. अननोन नंबरवरून आलेला मेसेज पाहण्यासाठी अनेक जण त्या नंबरचा डीपी पाहतात. सुंदर तरुणीचा तो डीपी असतो. लगेच 'हाय' म्हणून रिप्लाय दिला जातो... मग चॅटिंग सुरू होतं... पुढे सुरू झालेलं चॅटिंग व्हिडीओ कॉलमध्ये रूपांतरित होतं. व्हिडीओ कॉलमधून जी दृश्यं समोर दिसतात, ती पाहून समोरचा घायाळ होतो आणि इथेच तो फसतो..! आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा धंदा.
आधुनिक युगामध्ये बहुतांशी व्यवहार हे ऑनलाईन होऊ लागले आहेत, त्यामुळे चोऱ्या करणाऱ्यांनी तसेच दरोडे घालणाऱ्यांनीही आता सायबर क्राईमचा मार्ग अवलंबला आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसाढवळ्या अनेकांचे बैंक खाते रिकामे केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून व्हिडीओ कॉल करून समोरच्याला भुरळ घालून त्याचं चित्रण केलं जात आहे. हेच चित्रण पुन्हा त्याला पाठवून पैसे पाठवण्याची तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे अनेक तरुण या सायबर गुन्हेगारांची शिकार बनत आहेत.
सायबर गुन्हेगारांनी अवलंबलेला हा मार्ग आता जुना झाला असला, तरी अजूनही शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक जण त्याला बळी पडत आहेत. गेल्या महिनाभरात त्यात वाढ झाली आहे. बदनामी आणि भीतीपोटी मात्र बळी पडणारे तक्रार दाखल करत नाहीत.
खासकरून रात्री दहानंतर हा खेळ सुरू होतो. ऑनलाईन दिसणाऱ्या समोरच्या व्यक्तीला 'हाय' म्हणून मेसेज पाठवला जातो. अननोन नंबरवरून आलेला मेसेज असल्यामुळे अनेक जण त्याचा डीपी पाहतात. सुंदर तरुणीचा हा डीपी पाहिल्यानंतर अनेकांना रिप्लाय देण्याचा मोह आवरत नाही आणि तिथून पुढे चॅटिंग सुरू होतं. सर्व चंटिंग हिंदीमधून होते. 'आप कहां से हो... क्या करते हो...' असं म्हणत माहिती घेतली जाते. लगेच व्हिडीओ कॉलवर आपण बोलूया म्हणून मेसेज येतो आणि व्हिडीओ कॉल केला जातो. समोर सुंदर तरुणी दिसते. काही बोलायच्या आतच ती परिधान केलेली वस्त्रे हळूहळू कमी करू लागते आणि अचानक निर्वस्त्र होते. समोरचा मात्र हे दृश्य पाहतच राहतो आणि इथेच तो फसतो.
समोरच्यालाही मग त्या तरुणीकडून 'मुझे आपका फेस दिखाई नहीं देता... रोशनी में आओ... मुझे आपको देखना है... वॉशरूम मे जाओ...' अशा एकेक मधाळ वाक्यांनी भुरळ घालून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला जातो. समोरचा तिच्या त्या लाघवी कृत्यामुळे तिच्या जाळ्यात अडकतो आणि व्हिडीओ कॉल बंद होतो.
तिथून पुढे ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू होतो. साधारणतः तासाभरानंतर किंवा पहाटेच्या वेळेस रात्रीचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केलेली क्लिप संबंधिताला पाठवली जाते. लगेच पैशाची मागणी केली जाते. पैसे पाठवा; अन्यथा तुमची क्लिप व्हायरल करू, अशी धमकी दिली जाते. भीती आणि बदनामीपोटी अनेक जण त्यांची मागणी पूर्ण करतात.
एवढ्यावरच ते थांबत नाहीत. थोड्यावेळाने किंवा पहाटेच्या वेळेस दुसऱ्या अननोन नंबरवरून मेसेज येतो. ज्या नंबरचा डीपी हा पोलिसांची वर्दी असलेल्या तरुणाचा असतो. 'आपण एका तरुणीची क्लिप व्हायरल केली आहे. आपल्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे, त्यामुळे पोलिस सकाळपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील,' असा संदेश पाठवला जातो. या मेसेजमुळे समोरचा पुरता भेदरून जातो. तेवढ्यात पुन्हा कॉल येतो, 'मी सायबर क्राईममधून बोलतोय. आपल्यावर एफआयआर दाखल झाली आहे. प्रकरण मिटवायचे असेल, तर दिलेल्या नंबरवर पैसे पाठवा; अन्यथा आपल्याला अरेस्ट केले जाईल.' अशी धमकी दिली जाते. भीतीपोटी ही मागणी काही जणांकडून पूर्ण केली जाते, तर काहींकडून विनवण्या करून शक्य तितकी रक्कम पाठवली जाते.
अशा पद्धतीने अनेक जण या सायवर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. यात ग्रामीण भागातील तरुणांची संख्या अधिक आहे. याविषयी जनजागृती होण्याची गरज आहे.