इगतपुरी (नाशिक): नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलिस ठाणे हद्दीतील राजुर शिवारात एका फॅमिली रेस्टॉरंटच्या मागील मोकळ्या जागेत अनधिकृतपणे कंटेनरमधून स्टील उतरवून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले.
काळ्या बाजारात स्टील विक्री करणाऱ्या टोळीकडून ८१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या प्रकरणी विशेष पथकातील पोलीस हवालदार शुभम बाळू गुरव यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी निसार अहमद इस्लाम खान (५५,रा. अंबड लिंक रोड, नाशिक), साहेब आलम निसार अहमद खान (२६, रा. अजमेरी नगर, नाशिक), हरिशंकर कनिकराम विश्वकर्मा (२१, रा. रिंग्वा, डुमरियागंज, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मोहम्मद जमाल रजा बाबुल्ला (१९, रा. छगडीवा, इटवा, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), सुरज रामभगेलू यादव (२३, रा. चनमडी, पट्टी, प्रतापगड, उत्तर प्रदेश), विश्वजित रामचंदर शर्मा (२८, रा. बजेठी, लम्भुआ, सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. पथकाने सहा संशयितांकडून १० लाख रुपये किमतीचा आयशर (एमएच 15 जेडब्ल्यू 0113), टाटा ट्रेलर (एमएच 46 बीबी 3551) अंदाजे किंमत १५ लाख, स्टीलचे रॉड ३३.३३ लाख, इतर स्टील साहित्य १३.०९ लाख, आयशरमधील स्टील व शिडी३.०९ लाख असा एकूण ८१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.