बिष्णोई गँगचा मुंबईवर डोळा! pudhari photo
क्राईम डायरी

Bishnoi gang | अमाप पैसा अन् दबदबा...; बिष्णोई गँगचा मुंबईवर डोळा!

पुढारी वृत्तसेवा
नरेंद्र राठोड, ठाणे

मुंबई या महानगराने अनेकांना मोठं केलं. दाऊदसारखा गुंड जगात डॉन म्हणून ओळखला गेला तो फक्त त्याने मुंबई महानगरात गुंडगिरी केली म्हणूनच! मुंबईवर वर्चस्व म्हणजे अमाप पैसा, प्रसिद्धी अन् दबदबा आपल्या वाटेला आलाच समजा हे अनेक गुंड ओळखून आहेत.

कधी काळी मुंबई महानगरात एरिया, मोहल्ल्यात भाईगिरीचे वर्चस्व होते. हद्दीवरून उदभवणार्‍या वादात गुंडांच्या टोळ्या आमने-सामने येत आणि त्यामुळे गँगवार भडकायचा. या गँगवारमध्ये अनेकांचे बळी जात असत. त्यामुळे मुंबईतील गुंड लोकांच्या सिंडिकेटने आपसी समजुतीने प्रत्येक गुंडाला आपापला एरिया नेमून द्यावा, असा तोडगा काढला. सिंडिकेटने ठरवून दिलेल्या एरियात दुसर्‍या गुंडाने हस्तक्षेप करायचा नाही, असा सक्त नियम ठरवून देण्यात आला होता.

त्यामुळे ठरवून दिलेल्या प्रत्येक एरिया मोहल्ल्यात भाईगिरी करणारी मंडळी सर्वपरिचित असायची. तर इतर एरियाचा गुंड दुसर्‍या एरियात जाऊन काहीही उपद्रव करू शकत नव्हता. मात्र मुंब्रातील डोंगरी, भायखळा, गिरगाव, लालबाग, चिंचपोकळी, धारावी अशा छोट्या छोट्या गल्ली मोहल्ल्यात भाईगिरी करणारे छोटेमोठे गुंड हळूहळू मुंबई अंडरवर्ल्डचे डॉन म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले. अंडरवर्ल्ड डॉन हे बिरुद लागल्याने या गुंड मंडळींचा बिल्डर, अभिनेते, निर्माता, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते यांच्यावर दबदबा निर्माण होऊ लागला. हा दबदबा इतका प्रचंड होता की भलेभले नेते अन् अभिनेते या डॉन मंडळींच्या पार्ट्यांमध्ये गपगुमान हजेरी लावत असत.

कधी काळी मुंबईतल्या गल्ली मोहल्ल्यात हप्ते वसूल करणार्‍या या गुंडांपैकी काहींनी प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली मुंबईत खंडणी वसुलीचा नवा पायंडा पाडला. ऐंशी व नव्वदच्या दशकात खंडणी अन् प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली व्यापारी, उद्योजक, बिल्डर यांच्याकडून लाखो करोडो रुपये उकळण्याचा धंदा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये मोठ्या तेजीत होता. जो प्रोटेक्शन मनी देईल त्याला ही गुंड मंडळी स्वत: तर अभय देतच होते, परंतु इतरही गुंडांच्या टोळ्यांपासून त्यांचे रक्षण करण्याचा शब्द देत असत. प्रोटेक्शन मनी देण्यास नकार देईल त्याची हत्या हे गुंड घडवून आणायचे.

अशा हत्या घडवल्याने इतरांमध्ये भय निर्माण होऊन खंडणी वसुलीचा धंदा तेजीत यायचा अन् हत्या घडवणार्‍या गँगचे वर्चस्व देखील वाढायचे. गँगवार आणि प्रोटेक्शन मनीच्या काळ्या खेळात अनेकांचे बळी गेल्यानंतर पोलिस दल अ‍ॅक्शन मोडवर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी टाडा, एमपीडीए कायदा, एन्काऊंटर असे विविध मार्ग वापरून अनेक अंडरवर्ल्ड डॉन मंडळींना सळो की पळो करून सोडले. इतकेच नव्हे तर मुंबईतल्या गल्ली मोहल्ल्यातील भाईगिरीवर देखील पोलिसांनी बर्‍याच अंशी अंकुश लावला.

मुंबईत अंडरवर्ल्डचा बिमोड झाल्याच्या दीड दशकानंतर आता पुन्हा एकदा या महानगरात गुन्हेगारीचे संकट परतत असल्याचे दिसू लागले आहे. मात्र, यावेळी मुंबईतल्या अंतर्गत टोळ्या अथवा स्थानिक गुंडांचे नव्हे तर परप्रांतीय गुन्हेगारांचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मुंबईत भररस्त्यात बाबा सिद्दीकीसारख्या दिगग्ज नेत्याच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुन्हेगारांची टोळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बिष्णोई टोळीने (Bishnoi gang) सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीरपणे या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार आदी प्रांतात गुन्हेगारी कारवाया करून हैदोस माजवणार्‍या बिष्णोई गँगने मागील काही काळापासून मुंबईवर आपली नजर रोवली आहे. काळवीटाची शिकार केली म्हणून आमच्या टार्गेटवर अभिनेता सलमान खान आला असल्याचे कारण वेळोवेळी पुढे करून बिष्णोई गँग मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार घडवून आणल्यानंतर बिष्णोई गँगने आम्ही मुंबईत देखील गुन्हेगारी कारवाया घडवून आणू शकतो हे दाखवून दिले होते. मात्र, सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग नंतर बिष्णोई गँगची फारशी चर्चा झाली नाही. उलट पोलिसांनी अवघ्या काही काळातच गोळीबार करणार्‍या शूटरांना बेड्या ठोकल्या अन् मुंबईत कोणत्याही गँगची गुन्हेगारी चालणार नाही हे दाखवून दिले. इतकेच नव्हे तर सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या एका शूटरने तुरुंगातच आत्महत्या करून घेतली.

या सार्‍या उलट पडलेल्या डावपेचात मोठे काहीतरी करून मुंबईत आपला दबदबा निर्माण करण्याचे मनसुबे बिष्णोई गँग आखत होती. सलमान खानला दिलेले भक्कम पोलिस संरक्षण भेदने कठीण आहे हे ठाऊक असलेल्या बिष्णोई गँगने त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा शोध सुरू केला. साहजिकच त्यात बाबा सिद्दीकी हे नाव देखील होते. बाबा सिद्दीकी यांना टार्गेट केल्यास सलमानमुळे ही हत्या झालीय हे देखील दाखवता येईल व मुंबईवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी दाऊदसारख्या गुंडाला देखील आव्हान देता येईल हा मनसुभा बिष्णोई गँगचा होता.

मुंबई मायानगरीत गुन्हेगारीचा हैदोस माजवल्यास सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाती लागेल. तसेच जागतिक दर्जावर गँगचे नाव होईल ही बिष्णोई गँगची सुप्त इच्छा आहे. कारण बिष्णोई टोळी पैशापेक्षा आपले नाव मोठे करण्यासाठी जास्त आटापिटा करते हे सर्वश्रुत आहे. पंजाब, हरियाणात अनेक हत्या फक्त नाव व दबदबा निर्माण व्हावा यासाठी बिष्णोई गँगने घडवून आणल्या आहेत. बिष्णोई टोळीत अनेक तरुण उच्चशिक्षित असून टोळीतील हे सदस्य सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहेत. एखादी गुन्हेगारीची घटना घडवून आणल्यानंतर त्या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ व पोस्ट गँगची मंडळी व्हायरल करतात. त्यामुळे बिष्णोई गँगचा मोठा चाहता वर्ग सोशल मीडियावर असून अनेक शूटर गँगमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमानेच जोडले जातात.

बिश्नोई गँगचा डॉन म्हणून ओळखला जाणारा लॉरेन्स बिश्नोई सध्या जेलमध्ये असूनदेखील तो सर्रास मोबाईल वापरतो हे वेळोवेळी समोर आले आहे. तो स्वतः जेल मधून सार्‍या सोशल मिडियावरच्या चर्चांवर नजर ठेवून असतो. तसेच जेल मधून व्हिडीओ कॉल करून धमकी देणे, खंडणी वसुली करणे, सुपारी देणे आदी कामे तो फोनच्या मदतीने करतो. संपूर्ण बिश्नोई टोळी इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात. ही टोळी तरुणाईला आकर्षित करण्यावर जास्त भर देते. सोशल मीडियावर वेगवेगळे कंटेंट बनवून तरुणाईला आकर्षित करीत असतात.

बिष्णोई गॅँगचा गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना ओढण्याचा प्रयत्न

बिष्णोई टोळी छोट्या-मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. पोलीस ज्यांच्या शोधात आहेत, त्यांची माहिती मिळवून त्यांना मदत करण्याचा, पोलिसांपासून वाचविण्यासाठी आश्रय देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेऊन त्यांच्याकडून मोठे गुन्हे करवून घेते. बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल व जिशान अखतर या दोघांना देखील बिश्नोई गँगनेच हत्येच्या गुन्ह्यात जामीन मिळवून जेल बाहेर आणले होते. त्यानंतर या दोघांचा वापर मुंबई हत्याकांडात करण्यात आला. बिश्नोई टोळीच्या जाळ्यात राज्यातील अनेक तरुण अडकल्याची देखील चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT