नरेंद्र राठोड, ठाणे
राजकीय नेते बाबा सिद्धीकीची हत्या, अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार अन आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीवार या साऱ्या घटनांनी बॉलिवूड मध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. या साऱ्या घटनांनी जबाबदारी कुख्यात बिष्णोई गँगने घेतली आहे. आम्ही देशप्रेमी अन भगतसिंग यांच्या विचारांचे आहोत असे सांगत आणि काळवीट शिकराचे कारण पुढे करीत बिष्णोई टोळी सलमान खानच्या नावाकडून वारंवार बॉलिवूड जगतात उपद्रव करीत आहे.
पण वास्तवात बिष्णोई टोळीचे हे सारे नाटक फक्त एक्सटॉर्शन मनीचा गेम आहे. स्वतःला क्रांतिवीर भगतसिंग यांच्या विचारांचे अनुयायी म्हणून घेणारे कुणाही सभ्य माणसाला विनाकारण त्रास देऊ शकत नाहीत आणि बेईमानीने कुठल्याही व्यक्तीकडून खंडणीही उकळू शकत नाहीत. सहाजिकच जगाला दाखवलेले देशप्रेमाचे खोटे मुखवटे जपण्यासाठी सलमानच्या काळवीट शिकाराचे कारण पुढे करून वारंवार बॉलिवूड मध्ये उपद्रव करायचा अन त्याआडून खंडणी उकलायची हाच सारा प्लॅन बिष्णोई गॅंगचा आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी सायंकाळी मुंबईच्या जुहू परिसरात तीन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात टायगर सुदैवाने सुखरूप बचावला. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुन्हेगार टोळी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या बिष्णोई गॅंगने घेतली आहे. अनिल पंडित अनमोल बिश्नोई या नावाने फेसबुकवर पोस्ट करून ही जबाबदारी घेण्यात आली आहे. अनिल पंडित आणि हरमन संधू हे दोघेही कुख्यात गुंड या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही या टायगरला फोनवरून समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही. म्हणून आज त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. जो कोणी आमचे म्हणणे ऐकणार नाही किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याचा पुढचा नंबर असेल... वेट अँड वॉच... अशा शब्दात सोशल मीडियावर बिष्णोई गँगने अख्ख्या बॉलिवूडला धमकावले आहे. काळवीट शिकारीचे प्रकरण वारंवार पुढे करीत सलमानशी वैर असल्याचे भासवून बिष्णोई टोळी साऱ्या बॉलिवूड मध्ये दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात आहे.
पण वास्तवात सलमान खान फक्त बहाणा असून बॉलिवूड मध्ये दशहत पसरवून खंडणी उकळण्याचा हा सारा बिष्णोई गॅंगचा छुपा मनसुबा आहे. बिष्णोई टोळीतले गुंड परदेशात बसून दररोज कुठल्या न कुठल्या नेत्याला अथवा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकवत असतात. आता या टोळीची नजर बॉलिवूडवर असून येथील खोऱ्याने होणाऱ्या कमाईतुन त्यांना देखील हिस्सा हवाय. स्वतःला क्रांतिवीर भगतसिग यांच्या विचारांचे अनुयायी म्हणून घेणारे सरळ सरळ तर कुणाही बॉलिवूड सेलिब्रिटीस खंडणीसाठी धमकवू शकत नाही, म्हणून मग सलमानचे नाव पुढे करून सोशल मीडियावरून हेरलेल्या नवख्या शूटरांचा वापर करून ही गॅंग बॉलिवूड मध्ये वारंवार असे भ्याड हल्ले करीत आहे हे आता सर्वश्रुत होत आहे.
काळवीट शिकार केली म्हणून सलमान खान आमचा वैरी आहे इतपत म्हणणे तर ठीक पण सलमान सोबत जो काम करेल त्याला मारून टाकू ही भाषा करणारी बिष्णोई टोळी स्वतः पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रांशी संबंध ठेवून आहे. बिष्णोई गँगचे पाकिस्तानातील अनेक गुंड व माफिया टोळीशी संबंध आहेत. बिष्णोई गँगला शस्त्र व हत्याराचा पुरवठा पाकिस्तानातून होतो. तर ड्रग्ज तस्करीत देखील बिष्णोई टोळी पाकिस्तानमधील गुंडांची मदत घेत असल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. सलमान सोबत काम करणे बिष्णोई टोळीच्या नजरेत असम्य गुन्हा असेल तर मग आपल्या देशात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तान सोबत संबंध ठेवणे हा दहशतवादीपणा नाही का...? याचे उत्तर बिष्णोई टोळीकडे कदाचित नसेल.
विचार, तत्व, देशप्रेमाची भाषा करणारी बिष्णोई टोळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून देशातील तरुणाईत सतत आम्ही जे करतोय ते देशप्रेम आहे हे भासवत असते. या टोळीच्या जाळ्यात अनेक तरुण अडकतात. त्यापैकी काही तरुणांना हेरून ही टोळी परदेशात स्थायिक करण्याचे व पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले घडवून आणत असते. मुंबईत बिष्णोई टोळीने आता पर्यंत घडवून आणलेल्या सर्व हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
या सर्व पकडले गेलेल्या शूटरांना आपण किती मोठा गुन्हा करतोय याचे भानही नसते. तर त्यांच्या मनात ते काहीतरी मोठे व चांगले काम करीत आहेत असे सतत रुजवण्यात येते. एकीकडे हल्ला झाल्यानंतर विदेशात लपून बसलेले गँगस्टर मोठ्या अहंकारात आम्ही हे घडवून आणलेय याची जबाबदारी सोशल मीडियावर घेतात. तर दुसरीकडे हल्ल्यात वापरलेल्या शूटरांची ही टोळी नंतर साधी खबरही ही घेत नाही. सोशल मीडियावरून हेरलेल्या शूटरांचा ही टोळी फक्त युज अँड थ्रो असा वापर करते.
सध्या बिष्णोई टोळीचे कारनामे देखील अशाच चिंधीचिरीच्या वाटेवर आहेत हे त्यांच्या कारनाम्या वरून दिसून येतेय.
पुजारी गँगचीही होती दहशत
काही काळापूर्वी मुंबई ठाण्यात रवी पुजारी व सुरेश पुजारी या टोळीने देखील अशाच प्रकारे उपद्रव सुरू केला होता. युपी बिहार मधून भाड्याने शूटर आणून ही टोळी एखाद्या बिल्डर व व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करायचे. त्यानंतर या हल्ल्याचे उदाहरण पुढे करून इतर शंभर जणांना विदेशात बसून हे पुजारी ब्रदर धमकवत असत. पुजारी गॅंग बिल्डर, व्यापारी यांना धमकवण्या इतपतच थांबली नव्हती तर राज्यातील अनेक आमदार, राजकीय नेत्यांना देखील ही पुजारी गॅंग खंडणीसाठी धमकी देत असे. पण नंतर हाच पुजारी गॅंगचा एक्सटॉर्शन गेम अंडरवर्ल्ड मध्ये चिंधीगिरी म्हणून ओळखला जाऊ लागला.
नंतरच्या काळात तर काही राजकीय नेते व बिल्डर आपल्या प्रतिस्पर्धीला धमकवण्यासाठी पुजारी टोळीचा वापर करीत असे अन प्रतिस्पर्धीला फक्त धमकवण्यासाठी पुजारी टोळीस चिरीमिरी दक्षिणा देत असे. त्यावेळी काही बॅड कॉप इमेज असलेले पोलीस अधिकारी देखील पुजारी गॅंगचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेत असत. पुजारी टोळीने एखाद्या बिल्डरास पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकीचा फोन केला की, काही वेळेतच या पोलीस अधिकाऱ्यांची माणसे त्या बिल्डरकडे पोहचत व पुजारीला पाच कोटी देण्यापेक्षा आम्हाला दोन कोटी दे, आम्ही तुझे पुजारी गॅंग पासून प्रोटेक्शन करू असे सारा गेम त्यावेळी चालायचा.