डोंबिवली (ठाणे) : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याण पूर्वेकडे असलेल्या चक्कीनाका परिसरातील एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा मृत विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी हिला गुरूवारी (दि.19) रोजी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. ए. पत्रावाले यांनी जामीन मंजूर केला. गुन्हा आल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून साक्षी तुरूंगात होती. तपास आणि खटल्याच्या कामात सहकार्य करत असल्यामुळे साक्षीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सोमवार, दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय बालिकेचा अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता. ही बालिका कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी होती. घरातून दुकानात जात असताना पाळत ठेवलेल्या विशाल गवळीने त्या बालिकेला चॉकलेटचे अमिष दाखवून स्वत:च्या घरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर विशालने त्या बालिकेची राहत्या घरात क्रूरपणे हत्या केली. या कालावधीत विशालची पत्नी बँकेत नोकरीच्या ठिकाणी कामावर हजर होती. बालिकेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशाल प्रयत्न करत होता. संध्याकाळी पत्नी साक्षी घरी आल्यावर पतीने घरात बालिकेची हत्या केल्याचे निदर्शनास आले.
विशाल आणि त्याची पत्नी साक्षीने एका रिक्षा चालकाच्या सहकार्याने मध्यरात्रीच्या सुमारास बालिकेचा मृतदेह कल्याण-भिवंडी रोडला असलेल्या बापगाव हद्दीत फेकून दिला. त्यानंतर विशाल फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर पत्नी साक्षी हिला देखिल अटक करण्यात आली. या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात साक्षीचाही सहभाग असल्याचा आरोप बालिकेच्या कुटुंबीयांनी केला होता. हे प्रकरण विशेष जलदगती न्यायालयासमोर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी जोरदार मागणी नागरिकांसह दिवंगत बालिकेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. या प्रकरणात सरकारने सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांची नियुक्ती केली होती.
हा खटला कल्याण जिल्हा न्यायालयातील विशेष बाल लैंगिक अत्याचार न्यायालयात चालविला जात होता. या खटल्याच्या सुनावण्या सुरू होत्या. याच दरम्यान एकीकडे विशाल गवळी याने रविवारी १३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास तळोजा कारागृहातील शौचालयात टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरीकडे साक्षीच्यावतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या गुन्ह्यात बालिकेचे अपहरण करून तिचा खून साक्षीचा पती विशालने केला होता, असे न्यायालयाला साक्षीच्या वकिलांकडून सांगण्यास आले. साक्षीने पतीला मृतदेह लपविण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी साह्य केल्याचा तिच्यावर आरोप आहे. गुन्हा घडला त्यावेळी आपण बँकेत कामावर होते. घरी येण्यापूर्वीच गुन्हा घडून गेला होता. या प्रकरणात विशालने धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपणास मदत करण्यास सांगितले, असे साक्षीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून ९४८ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तपास आणि खटल्याच्या कामात साक्षीकडून सहकार्य केले जात आहे. त्यामुळे सरकारी वकील आणि तपास यंत्रणांनी तिच्या जामिनाला हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तर साक्षी गवळी हिची भूमिका पुरावे लपविण्यापुरती होती, असे मत न्यायालयाने नोंदविले. भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ (अ) अंतर्गत हा गुन्हा जामीनपात्र असल्याने न्यायालयाने तिला दहा हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले विशालचे तिन्ही भाऊ शाम, नवनाथ आणि आकाश गवळी यांना पोलिसांनी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार केले आहे.