Gold Smuggling | ५५ कोटींचे सोने बाळगणारा भिकारी! 
क्राईम डायरी

Gold Smuggling | ५५ कोटींचे सोने बाळगणारा भिकारी!

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत शिंदे, सांगली

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा, मूळ दिघंची गावचा रहिवासी असलेला अक्षय बनसोडे याचा हा कारनामा आणि त्याला गुवाहाटी पोलिसांनी केलेली अटक, एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच थरारक आहे. अक्षय बनसोडे गुवाहाटीच्या गांधी बस्ती भागात गेल्या दोन महिन्यांपासून राहात होता. तस्करांच्या दुनियेत पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी वेशांतर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अक्षयने यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग निवडला तो म्हणजे ‘अदृश्य’ होणे. समाजात अशा व्यक्तीकडे कोणी लक्ष देत नाही, ज्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची दिसते. तो गुवाहाटीच्या रस्त्यांवरून फिरताना एखाद्या बेघर मजुरासारखा किंवा भिकाऱ्यासारखा वावरत असे. मात्र, हा वेश केवळ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी होता. प्रत्यक्षात, या कामासाठी आंतरराष्ट्रीय तस्करांनी त्याला दरमहा ८० हजार रुपये पगार निश्चित केला होता, शिवाय राहण्याचा आणि खाण्याचा मोठा खर्च वेगळा मिळत होता.

५५ कोटींचे ते जुने ब्लँकेट

काही दिवसांपूर्वी एका रात्री गुवाहाटी पोलिसांना एका मोठ्या सोन्याच्या खेपेची अत्यंत अचूक माहिती मिळाली. लटाशिल पोलिस ठाण्याचे पथक आणि गुवाहाटीच्या पोलिस उपआयुक्त शांभवी मिश्रा यांनी खारघुली परिसरात सापळा रचला. तितक्यात पोलिसांच्या माहितीशी जुळणारा तोच मळकट कपड्यातील तरुण हातात कपड्यांचे गाठोडे आणि एक जुने ब्लँकेट घेऊन जाताना दिसला.

पोलिसांनी त्याला थांबवले. सुरुवातीला त्याने आपण अत्यंत गरीब मजूर असल्याचे नाटक केले. पण, पोलिसांनी जेव्हा त्याच्या हातातील त्या जुन्या ब्लँकेटची तपासणी केली, तेव्हा पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. त्या फाटलेल्या ब्लँकेटच्या आत अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेल्या २४ कॅरेट सोन्याच्या विटा आणि बिस्किटे चमकत होती. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ३७.३४ किलो शुद्ध सोने जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आसाम पोलिसांच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा साठा ठरला.

‘स्मार्ट’ गुन्हेगार!

इंटरनेट कॉल्स आणि व्हाॅटस्‌ॲपचे मायाजाल: अक्षय दिसायला जरी सामान्य आणि गरीब वाटत असला, तरी तांत्रिकदृष्ट्या तो अत्यंत चतुर आहे. पोलिसांच्या रडारवर येऊ नये म्हणून त्याने कधीही सामान्य सिमकार्डवरून थेट फोन कॉल्स केले नाहीत. तो म्यानमारमधील मुख्य तस्करांच्या संपर्कात राहण्यासाठी केवळ इंटरनेट आधारित कॉल्स आणि व्हाॅटस्‌ॲप कॉल्सचा वापर करत असे. तपासात समोर आले की, ही त्याची पहिली खेप नव्हती. या भिकाऱ्याच्या वेशाचा वापर करून त्याने यापूर्वी ३ खेपा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या आणि एकूण २० किलो सोने सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. या चौथ्या खेपेत तो ५५ कोटींचे सोने घेऊन रेल्वेमार्गे मुंबई, दिल्ली आणि बंगळूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये ते पोहोचवणार होता.

एका खेपेमागे ७ कोटींचा नफा

अक्षय बनसोडे सारखे तरुण एवढा मोठा धोका का पत्करतात? यामागे आहे म्यानमार आणि भारतातील सोन्याच्या दरांमधील प्रचंड तफावत आणि त्यातून मिळणारा कोट्यवधींचा नफा. या फरकामुळे १ किलो सोन्याच्या मागे तस्करांना सुमारे १८.५ ते २१.५ लाख रुपयांचा थेट नफा होतो. अक्षयकडे जे ३७ किलो सोने सापडले, त्या एकाच खेपेच्या मागे तस्करांना सुमारे ७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळणार होता.

भारत सरकारचे सीमाशुल्क आणि जीएसटी चुकवून हे सोने भारतात आणले जात होते. या नफ्यातील एक हिस्सा अक्षयसारख्या कुरिअर बॉईजमध्ये वाटला जात असे.

सांगली कनेक्शनचा जुना इतिहास

अक्षयच्या अटकेनंतर गुवाहाटी पोलिसांनी जेव्हा त्याचे रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्यांना या आंतरराष्ट्रीय तस्करीचे ‘सांगली कनेक्शन’ स्पष्ट झाले. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांना आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी कुरिअर बॉईज म्हणून जाळ्यात ओढण्याची ही पहिलीच वेळ नाही.

फेब्रुवारी २०१८ ला गुवाहाटीमध्ये ६.६ किलो सोन्यासह सांगलीच्या सोमनाथ सुबराव माने याला अटक झाली होती. ऑक्टोबर २०१८ ला गुवाहाटी रेल्वे स्थानकावर ‘सराईघाट एक्स्प्रेस’ मधून ८ किलो सोन्यासह सांगलीच्या किरण विश्वनाथ पाटील याला अटक करण्यात आली होती. याच साखळीचा पुढचा भाग म्हणून अक्षय बनसोडेने ‘भिकाऱ्याचा वेश’ धारण करून तस्करीची ही नवीन पद्धत शोधून काढली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT