अमली पदार्थ तस्करी व विक्रीविरोधात ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई मोहीम उघडली आहे. Pudhari News Network
क्राईम डायरी

Anti-Drug Action Thane | ठाण्यात ड्रग्जविरोधी कारवाई जोमात

2 दिवसात तीन ठिकाणी छापे; 2 कोटी 37 लाखांच्या एमडीसह 22 लाखांचा गांजा जप्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे व परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अमली पदार्थ तस्करी व विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई मोहीम उघडली आहे. ड्रग्जचे तरुणाईत वाढते लोण रोखण्यासाठी पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाई कठोर केली असून या कारवाई अंतर्गत गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी छापमारी करून वेगवेगळ्या कारवाईत तब्बल 2 कोटी 37 लाखांचे एमडी पावडर तर 22 किलो गांजा ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला आहे. या तीनही गुन्ह्यात एकूण 2 कोटी 60 लाखांचा अमली पदार्थसाठा जप्त करण्यात आला असून 7 जणांना अटक केली आहे.

सध्या अमली पदार्थ सेवनाची समस्या सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे. ठाण्या-मुंबईत ड्रग्जचा भस्मासुर हळूहळू आपला वेढा घट्ट करतोय. वाढती ड्रग्जविक्री व तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत तीन ठिकाणी छापमारी करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थसाठा जप्त केला आहे.

पहिली कारवाई

उल्हासनगर येथे 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. उल्हासनगर येथील साईबाबा मंदिर चौकात दोन जण एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरिफ मोहम्मद शरीफ खान (21, उल्हासनगर 3) आणि सफीकुर रहेमान सिराज अहमद खान (22, उल्हासनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांना 11 लाख 72 हजार 500 रुपये किमतीचे 58.1 ग्रॅम एमडी पावडर हे ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त करीत दोघांना बेड्या ठोकल्या.

दुसरी कारवाई

11 फेब्रुवारी 2025 रोजी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका येथे करण्यात आली. नेवाळी नाका येथील भोईनगर येथे दोन जण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर अमली पदार्थविरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नेवाळी येथून मंगल उत्तम पवार (25, करडगाव, परभणी) व अमर सुभाष पवार (36, नेवाळी) या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 44 किलो 855 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 22 लाख 85 हजार 100 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिसरी कारवाई

डायघर परिसरात 12 फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली. डायघर परिसरात ठाकुरपाडा येथे एका इमारतीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकास मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री एमडी विक्रीसाठी आलेल्या इलियास कुशहाल खान (19, प्रतापगड, राजस्थान), अमान कमाल खान (21, डायघर), सैफअली असाबउल हक खान (25, डायघर) या तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची झडती घेतली असता तिघांच्या ताब्यात 1109.1 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. 2 कोटी 25 लाख 45 हजार 500 रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले. तर पोलीस चौकशीत या तिघांनी एका महिलेला आधीच 800 ग्रॅम वजनाचे एमडी विकल्याची माहिती समोर आली आहे. आणखी एमडी विकण्याच्या प्रयत्नात तिघे असतानाच अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांना डायघर येथील ठाकूरपाडा भागातून जेरबंद केले. तिघांनी हे एमडी राजस्थानमधून आणल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT