प्रभाकर धुरी, पणजी
गेल्या आठवड्यात मोरजी मधलावाडा येथे एलिना वालिवा हिचा, तर हरमल बामणभाटी येथे एलिना कास्तानोव्हा हिचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी संशयावरून आलेक्सी लिवोनोव्ह याला अटक केली व पेडणे न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर मात्र आलेक्सीने जे दावे केले, ते पोलिस खात्याला चक्रावून आणि गोव्याला हादरवून सोडणारे आहेत.
आलेक्सीने या दोन्ही महिलांचे खून आपणच केल्याची कबुली दिली आहे. कोरगाव भालखाजन येथे ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या आसामी महिला मधुस्मिता सायकिया (वय 40) या तिसर्या महिलेचाही खून आपणच केल्याचे आलेक्सीने म्हटले आहे. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने आपण गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मिळून 15 खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत असून त्याची जबाबातील विसंगती तपासात अडथळा ठरत आहे. त्यात पोलिस नेमकेपणाने पत्रकारांना माहिती देत नसल्याने कितीजणांची हत्या झाली आहे, याबाबत संभ्रम आहे.
आलेक्सी हा दिसायला सुंदर होता. त्यामुळे पर्यटक महिला त्याच्यावर भाळायच्या. त्यांच्याशी मग तो जवळीक करायचा. प्रेमाचे नाटक करून विश्वास संपादन करायचा आणि पैशांची मागणी करायचा. त्यानंतर पूर्वनियोजित पद्धतीने गोड बोलून प्रेमाचे चाळे करत महिलेचे हात मागे बांधून शारीरिक संबंध ठेवायचा आणि नंतर धारदार शस्त्राने गळा चिरायचा. दोन्ही रशियन महिलांना त्याने याच पद्धतीने मारल्याची कबुली दिली असून हत्येसाठी वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांच्या तपासात त्याने आपण हे खून संबंधितांना मोक्ष मिळवून देण्यासाठी केल्याचे सांगितले आहे. देशभरात गाजलेल्या गोव्यातील सीरियल किलर महानंद नाईक याच्यानंतर रशियन पर्यटक आलेक्सी हा दुसरा सीरियल किलर ठरण्याची भीती व्यक्त होत आहे; शिवाय आलेक्सीला विकृत म्हणावे की मनोरुग्ण, हाही प्रश्न आहेच.
दुपट्टा किलर म्हणून ओळखला जाणार्या महानंद नाईक याने केलेल्या सोळा युवतींच्या खुनामुळे 2009 मध्ये संपूर्ण गोवा हादरला होता. तरवळे-शिरोडा (फोंडा) येथील रिक्षाचालक महानंदचे 1994 पासून खून सत्र सुरू होते. लग्नाचे वय उलटलेल्या सामान्य कुटुंबातील मुलींकडील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्याने थंड डोक्याने खून केले होते. मुलींना आधी प्रेमात ओढायचे व नंतर लग्नाचे आमिष दाखवित अज्ञातस्थळी नेऊन दुपट्ट्याने तिचा गळा आवळून खून करायचा. साधारण पंधरा वर्षे महानंदचे हे हत्यासत्र सुरू होते.
मार्च 2009 मध्ये शिरोडा येथील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली. या तपासकार्यात त्याने केलेल्या खुनाची एकामागून एक प्रकरणे उजेडात आली. शेवटचा खून त्याने कुर्टी - फोंडा येथील योगिता ऊर्फ बालिका नाईक हिचा केला होता आणि तिचा मृतदेह पर्ये सत्तरी येथे आढळून आला होता. भारतातील नंबर एकचा सीरियल किलर रामन राघवन याच्यानंतर महानंद नाईक याचा क्रमांक लागतो. रामन राघवन याच्या नावावर 21 खुनाचे गुन्हे नोंद आहेत. सध्या महानंद नाईक हा तुरुंगात असून त्याच्यावरील खुनाचे खटले अजूनही सुरू आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलेक्सीने उसनवार घेतलेल्या पैशांवरून आणि एका ‘रबरच्या मुकुटा’वरून या दोघींची हत्या केली असावी. एलेना कास्तानोवा ही फायर डान्सर होती. तिने फटाके कलाकार असलेल्या संशयिताकडून काही पैसे आणि एक फायर क्राऊन (नर्तक डोक्यावर आग ठेवण्यासाठी वापरतात तो रबरचा मुकुट) उसने घेतले होते. दुसर्या महिलेनेही पैसे उसने घेतले होते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, दोन्ही पीडितांनी अलेक्सीला पैसे आणि मुकुट परत केले नाहीत. यामुळे चिडून गळे चिरले, अशी माहिती आता पुढे येत आहे. बबल आर्टिस्ट असलेली एलेना वानीवा 10 जानेवारी रोजी गोव्यात आली होती, तर कास्तानोवा गेल्या वर्षी 25 डिसेंबरपासून राज्यात होती.
अनेक तरुणींची हत्या करून सराईतपणे गोव्यात वावरणार्या बिकिनी किलर चार्ल्स शोभराज याला गोव्यातच (पर्वरी) अटक झाली होती. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली विदेशातील गुन्हेगार गोव्यात येऊन लपणे किंवा ड्रग्ज व्यापार व अन्य गुन्हे करणे गोव्याला नवीन नाही.
अनेक विदेशी पर्यटक गोव्यात येतात. व्हिसा संपला तरीही राहतात. ड्रग्जची तस्करी करतात. अनेकजण तर राहत्या भाड्याच्या खोलीत ड्रग्ज लागवड करतात. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत असली, तरी ती पुरेशी नाही. त्यांच्या एकूण हालचालीवरच लक्ष ठेवण्याची गरज आहे. आसामी महिलेचा मृत्यू ड्रग्ज ओव्हरडोसने झाल्याचे उघड झाले असले, तरी आलेक्सीने तो खून आपणच केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्याकडे ड्रग्ज कुठून आले, आलेक्सीचा ड्रग्ज व्यवसायाशी काही संबंध आहे का, हे तपासण्याची गरज आहे.
गोव्यातील किनारी भागात रस्तोरस्ती अंधार्या जागी स्प्रे गनने ग्राफिटी चितारलेल्या दिसतात. त्या कलाकृती नसून ड्रग्जच्या व्यवहाराच्या जागा दर्शविणार्या सांकेतिक खुणा असतात. अशा जागांवर छापे पडणे आवश्यक आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
संशयित आलेक्सी हा पैशांच्या लालसेपोटी विदेशी महिलांशी आधी मैत्री करत असे. मैत्रीनंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून तो विश्वास संपादन करायचा व पैसे उकळायचा. संबंधित महिलांनी किंवा त्याच्या मैत्रिणींनी अन्य पुरुषांशी संबंध असल्याचा संशय आल्यास तो मानसिक छळ सुरू करत असे. मोरजी किनार्यावर एका भारतीय नागरिकाशी त्याचे भांडण झाले होते. एलिना कास्तानोव्हा याच्याशी त्याची मैत्री असल्याचा संशय या भांडणामागे होता. पोलिसांना भांडणाची कल्पना देऊनही पोलिस तेथे पोचले नाहीत. अन्यथा त्या रात्रीचे दुसरे हत्याकांड टळले असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.