खून करुन अपघाताचा बनाव file photo
क्राईम डायरी

Alcohol Addiction | पित्याने वैतागुन केला व्यसनी मुलाचा खून; मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव

दारुच्या आहारी गेलेल्या मुलाचा जन्मदात्यानेच केला खून

पुढारी वृत्तसेवा

जळगाव (जामनेर तालुका): फत्तेपूरजवळील कसबा पिंपरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका पित्यानेच आपल्या मद्यपी मुलाचा खून केल्याची घटना रविवारी (दि.22) रोजी उघडकीस आली.

शुभम सुरडकर (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या वडिलांनीच त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून हत्या केली. खून केल्यानंतर मृतदेह निर्जन रस्त्यावर टाकून हा प्रकार अपघात किंवा बाहेरील व्यक्तीने केला असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बायपासवरील निर्जन रस्त्यावर मृतदेह टाकून अपघाताचा बनाव

कसबा पिंपरी येथील रहिवासी धनराज सुपडू सुरडकर हे आपल्या पत्नी, मोठा मुलगा शुभम व धाकटा मुलगा गौरव यांच्यासह राहत होते. शुभम विवाहित होता; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे प्रचंड व्यसन लागले होते. तो दारूच्या नशेत घरच्यांशी वारंवार वाद घालत असे. चार दिवसांपूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती.

या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास पित्याने टोकाचे पाऊल उचलले. पित्याने शुभमच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याचा खून केला. नंतर मृतदेह घरातून हटवून त्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह फत्तेपूर-पिंपरी बायपासवरील निर्जन रस्त्यावर टाकण्यात आला होता.

असा  लागला सुगावा...

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच चौकशीत शुभमच्या घरी तपासणी करताना मध्यवर्ती खोलीत चटईखाली रक्ताचे डाग आढळून आले. यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी वडील धनराज सुरडकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच, मृतदेह बाहेर टाकण्यास लहान मुलगा गौरव व काका हिरालाल सुरडकर यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संदिप पाटील (स्थानीय गुन्हे शाखा), फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह पोलिसांचे पथक सहभागी होते. पुढील तपास फत्तेपूर पोलीस ठाणे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT