नाशिक : गौरव अहिरे
राज्यात अल्पवयीन मुला- मुलींवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे. बलात्कार, अपहरण, मारहाण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे, तर खून, अर्भक हत्या, भ्रूणहत्या अशा घटनांमध्ये घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले- मुली पीडित असतात. जिल्ह्यातही खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, मारहाण, छळ आदी गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले- मुली पीडित झाली आहेत. ओझर येथील 10 वर्षीय मुलीवरील अत्याचार, नाशिक रोड येथील दिव्यांग मुलावर अत्याचार, पंचवटीत आईच्या प्रियकराकडून चिमुकल्याचा झालेला निर्घृण खून, शालिमार येथील शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षाचालकांकडून झालेला विनयभंग आदी घटनांनी जिल्हा हादरला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुला- मुलींवरील गुन्ह्यांना अटकाव करण्याचे आवाहन पोलिसांना आहे. त्यासाठी कायद्यात पोक्सोची तरतूद करून लहान मुला- मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तरीदेखील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसते.
बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोक्सो कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बाल न्याय कायदा, बाल संरक्षण युनिट्स, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस युनिट्स, जागरूकता मोहीम, बाल सुरक्षा शिक्षण आणि क्षमता बांधणी मोहीम असे उपक्रम राबवले जात आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, हाणामारी, अत्याचार आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये विधिसंघर्षित बालकांचा समावेश आढळला आहे. त्यामुळे अत्याचार पीडितांसमवेत गुन्हेगारीमध्येही बालकांचा वाढता समावेश चिंताजनक ठरत आहे. जिल्ह्यात गत वर्षभरात १७८ विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.