नाशिक : सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीरजवळील मालगोंदा येथे पत्नीनेच पतीची कुर्हाडीने निर्घृण हत्या करून, तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात मृतदेह पुरून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयित पत्नीला बेड्या ठोकल्या असून, पुरलेला मृतदेहही शौचालयाच्या शोषखड्ड्यातून बाहेर काढला आहे.
सुरगाणा पोलिस ठाण्यात यशवंत मोहन ठाकरे (४२, रा. मालगोंदा, ता. सुरगाणा) हे दोन महिन्यांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार वडील मोहन मंगळू ठाकरे यांनी दिली होती. पोलिसांनी बेपत्ता यशवंतचा शोध नातेवाईक तसेच शेजारी गावांमध्ये घेतला मात्र, तो मिळून आला नाही. दुसरीकडे त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे (३८) हिने तिचा पती यशवंत हा १४ एप्रिल २०२५ पासून घरातून मजुरीकरिता गुजरातमधील बिलीमोरा येथे गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. तसेच ती स्वत: मजुरीकरिता बिलीमोरा येथे निघून गेली होती. मुलगा कामासाठी बाहेरगावी गेला असेल, तर तो घरी परतणार या आशेने यशवंतचे आई- वडील वाट बघत होते, तर त्याची पत्नी प्रभा ही पतीचा शोध का घेत नाही. सुमारे दोन महिन्यांपासून बेपत्ता यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची सूई प्रभाकडे वळली.
घरात तपास केला असता, घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेणमातीने सारवलेले दिसून आल्यामुळे यशवंतचे वडील मोहन ठाकरे यांनी पोलिसांकडे सुनेबाबत तक्रार केली. पोलिसांनी प्रभाला तपासणीसाठी ठाण्यात आणले. त्यानंतर महसूल विभागासमवेत घरातील शाेषखड्ड्यात खोदकाम केले असता, त्यावेळी काही आढळले नाही. त्यामुळे ती बिनधास्त फिरत होती. त्यानंतर यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथी यांना घरी यशवंतची चप्पल दिसल्याने दीर घरी आले का? असा प्रश्न केला असता, प्रभाने यशवंतची चप्पल मांडीखाली लपवत गप्पा मारल्या. यामुळे मेथी हिला संशय आला. त्यानंतर तिने याबाबत तिच्या पतीला सांगितल्यावर उत्तमने सायंकाळी घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्याजवळ जाऊन पाहिले असता, त्यात कुजलेला वास आल्याने माती उकरून पाहिली असता मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल मोरे, नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक अण्णा दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे, संदीप पगारे, रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड, लहूदास गायकवाड, रमेश महाले अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी मृत यशवंतची पत्नी प्रभाला ताब्यात घेतले. यावेळी तिने मीच कुर्हाडीने यशवंतचा खून केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेहाचे तीन तुकडे केल्याचेही सांगितले. दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत शोषखड्ड्यात पुरून ठेवलेल्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले. मात्र, दोन महिने मृतदेह कुजल्यामुळे यशवंतचा केवळ हाडांचा सांगाडा उरला होता. प्रभाने आपल्या पतीच्या शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात टाकले होते. तसेच त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेट आणि औषधे टाकून माती, मुरूम, भाताची फोतरे, प्लास्टिक पिशव्या टाकल्या होत्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.
गेल्या १४ एप्रिल रोजी दुपारी यशवंत ठाकरे हा मद्यप्राशन करून घरी आला असता, पत्नी प्रभा हिने त्यास जेवण वाढले. मात्र, त्याने जेवण फेकून दिले. तसेच तीला शिवीगाळ करीत मारहाण केली. तेव्हा प्रभाने घरातील कुऱ्हाडीने यशवंतच्या डोक्यात मारली. त्यानंतरही यशवंतने 'आता मी तुला मारूनच टाकतो' असे म्हटल्याने, तीने यशवंतच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यातच तो मृत झाला.