blood pressure tablet : भारतासह जगभरात साधारण ४० वय ओलांडली की सर्रास लोकांना BP किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवणाऱ्या गोळ्या घ्याव्या लागतात. स्ट्रेसफूल लाईफ, खाण्यपिण्याच्या सवयी, सोडीयमने भरलेले पॅकबंद पदार्थ यामुळे या गोळ्या वयाच्या चाळीशीतच डॉक्टर सुरु करतात. पण या गोळ्याचा शोध एक सापाच्या विषापासून लागला हे तुम्हाला माहिती होते का, जहाल विष ते मानसाचा जीव वाचवणारे औषध हा प्रवास आज पाहूया.
कोट्यवधी लोक दररोज रक्तदाबावर (बीपी) नियंत्रण ठेवण्यासाठी जी औषधे घेतात, त्यांची कहाणी एका अत्यंत विषारी सापापासून सुरू झाली आहे. १९४० च्या दशकात ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी पाहिले की, केळीच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांना जेव्हा 'जराराका' (Bothrops jararaca) साप चावायचा, तेव्हा ते बेशुद्ध पडायचे आणि त्यांचा रक्तदाब (बीपी) अत्यंत धोकादायक पातळीवर खाली यायचा.
१९६५ मध्ये ब्राझीलचे शास्त्रज्ञ सर्जिओ फरेरा (Sérgio Ferreira) यांच्या मनात एक विचार आला की, जर हे विष रक्तदाब कमी करू शकते, तर त्यापासून औषध का बनवता येऊ नये? त्यांनी या विषातील प्रथिनांचा (प्रोटीन) एक छोटासा भाग वेगळा केला, त्यांनी या विषातील घटकाला 'ब्राडीकिनिन-पोटेंशिएटिंग फॅक्टर' (BPF) असे नाव दिले होते जो शरीरातील एका विशिष्ट एन्झाईमला रोखण्याचे काम करतो. या एन्झाईमचे नाव आहे 'एसीई' (ACE) (angiotensin-converting enzyme). पुढे याचा शास्त्रज्ञानी सखोल अभ्यास केला व नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर जॉन व्हेन आणि स्क्विब कंपनीच्या शास्त्रज्ञांनी तोंडावाटे घेता येणारी पहिली गोळी (Captopril) तयार केली.
पुढे १९८१ मध्ये या औषधाला मंजुरी मिळाली आणि आज आपण जी 'प्रिल' (Pril) गटातील औषधे पाहतो—जसे की रॅमिप्रिल (Ramipril), लिसिनोप्रिल (Lisinopril)—ती सर्व याच शोधातून विकसित झाली आहेत. एकट्या अमेरिकेत एका वर्षात लिसिनोप्रिलची ७ कोटींहून अधिक प्रिस्क्रिप्शन लिहिली जातात.
हे औषध काम कसे करते
हे समजून घेण्यासाठी 'एसीई'ला एक यंत्र समजा, जे 'अँजिओटेन्सिन' नावाचे संप्रेरक (हार्मोन) तयार करते. हे संप्रेरक रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्यास भाग पाडते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. विषाचा तो छोटासा घटक या यंत्राच्या कुलुपात एखाद्या चावीप्रमाणे अचूक बसतो आणि ते यंत्र बंद पाडतो. परिणामी, रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्तदाब खाली येतो.
फुरसे च्या विषापासून तयार केले जाते हृदय विकाराचे औषध
या कथेतील एक रंजक वळण म्हणजे, हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत दिले जाणारे 'टायरोफिबॅन' (Tirofiban) हे औषध आपल्याच देशातील 'फुरसे' (Saw-scaled viper) या सापाच्या विषापासून प्रेरित होऊन तयार केले गेले आहे. हा तोच फुरसे साप आहे, ज्याची गणना भारतातील चार सर्वात विषारी आणि धोकादायक सापांमध्ये केली जाते.
कसे काम करते हे औषध?
फुरसे सापाच्या विषात 'इचिस्टाटिन' (Echistatin) नावाचे प्रथिन असते. जेव्हा फुरसे चावतो, तेव्हा हे प्रथिन रक्तातील प्लेटलेट्सना (रक्त गोठवणाऱ्या पेशी) एकत्र येण्यापासून रोखते, ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होतो. हृदयविकाराचा झटका किंवा अँजिओप्लास्टी दरम्यान नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (Clots) होणे अत्यंत जीवघेणे असते. शास्त्रज्ञांनी विषातील या गुणधर्माचा उलटा वापर केला आणि टायरोफिबॅन हे औषध बनवले. हे औषध नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही आणि रुग्णाचा जीव वाचवते.