जयदीप नार्वेकर : जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून शेणखत, कंपोस्ट खत, तसेच हिरवळीच्या खतांसारख्या सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविल्यास जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून पिकांची उत्पादकता वाढविता येईल. याबाबत थोडक्यात माहिती प्रस्तुत लेखात सादर केली आहे.
वर्षांनुवर्ष जमिनीत घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणार्या पिकांच्या नवीन वाणांमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेेंदिवस कमी होत आहे. तसेच अलीकडे रासायनिक खतांचा अतिवापर आणि सेंद्रिय पदार्थांचा कमी पुरवठा यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता घटू लागली आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्यामुळे विशेषत: कोरडवाहू विभागात शेती किफायतशीर करणे अवघड होऊ लागले आहे. त्यासाठी जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून शेणखत, कंपोस्ट खत, तसेच हिरवळीच्या खतांसारख्या सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविल्यास जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून पिकांची उत्पादकता वाढविता येईल.
सेंद्रिय पदार्थाला जमिनीचा प्राण किंवा केंद्रस्थान म्हणतात. सेंद्रिय पदार्थ वनस्पतींच्या मुळ्या, धसकटे, फांद्या आणि पाने इत्यादी भागापासून तयार होतात. याबरोबरच प्राण्यांचे अवशेषही त्यात भर घालतात. सेंद्रिय पदार्थांमुळे मातीच्या कणांची रचना दाणेदार बनून स्थिर होण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीची जलधारण शक्ती वाढते, निचरा चांगला होतो आणि हवा खेळती राहते. यामुळे पावसाळ्यात होणारी जमिनीची धुपही कमी होते. भारी चिकणमातीच्या समिनीत सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास जमिनीचा आकसपणा, चिकटपणा कमी होऊन जमिनीची मशागत चांगल्याप्रकारे जलधारण क्षमता वाढते आणि निचर्याद्वारे वाहून जाणारे पाणी आणि अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते. यामुळे पीक उत्पादन वाढीस मदत होते. सेंद्रिय पथार्दांच्या वापरामुळे जमिनीतील उपकारक अशा अॅझोटोबॅक्टर आणि रायझोबियम सारख्या हवेतील नत्र स्थिरीकरण करणार्या जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जमीन नांगरून त्यात ताग, शेवरी किंवा धैंचा पेरून एक ते दीड महिन्यांची जमिनीत गाडल्यास उत्तम हिरवळीचे खत मिळते. विशेषत: खारवट चोपण जमिनी सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा चांगला उपयोग होतो. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतातील वाया जाणारे काडीकचरा, सरमाड इत्यादींचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.
1) भरखते : यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, लेंडीखत, सोनखत, हिरवळीचे खत इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये पोषण द्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भरखते रासायनिक खतांपेक्षा मोठ्या प्रमाणावर वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते.
2) जोरखते : यामध्ये भुईमूग पेंड, करंज पेंड, लिंबोळी पेंड, हाडचुरा, मासळी खत इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये पोषण द्रव्यांचे प्रमाण भर खतांपेक्षा अधिक असते. यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात.