मानवी आहाराच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त परंतु शेतकर्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित कुळीथ हे एक कडधान्य पीक आहे. राज्यात अवर्षणप्रवण विभागामध्ये बर्याच मोठ्या प्रमाणावर माळरानाची, हलकी, उथळ कमी सुपीक जमीन उपलब्ध आहे. अशा ठिकाणी सुधारित पद्धतीने कुळीथ पीक घेतल्यास जास्त उत्पादन मिळून शेतकर्यांना चांगला फायदा होऊ शकतो. परंतु हे पीक भारी जमिनीत आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत घेण्याचे टाळावे.
तसेच मध्यम प्रकारच्या जमिनीत फक्त पावसावर देखील या पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकते. खरे तर या पिकाला 21 ते 25 अंश से. तापमान मानवते आणि 400 ते 500 मि.मी. पाऊस पुरेसा होतो. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर वापसा येताच जूनच्या तिसर्या आठवड्यात ते जुलैच्या दुसर्या आठवड्यापर्यंत कुळीथची पेरणी पूर्ण करावी. एक हेक्टर पेरणीसाठी 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे ठरते. पेरणी दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 10 सें.मी. ठेवून करावी.
खरे तर हे पीक पूर्ण पावसावर घेता येते. परंतु काही वेळेस पिकास फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाने बरेच दिवस ताण दिला तर उत्पादनात फार मोठी घट येते. अशा वेळेस संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.कुळीथ हे पीक हलक्या जमिनीत घेतले जाते, अशा जमिनीत अन्नद्रव्ये कमी प्रमाणात असतात. अशा जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून द्यावे. पेरणी करताना पिकाला 15 किलो नत्र आणि 13 किलो स्फुरद ही खतांची मात्रा मिळण्यासाठी साधारण 75 किलो डायअमोनियम फॉस्फेट प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे.
तणांचा बंदोबस्त होण्यासाठी आंतरमशागत वेळेवर करावी. ढगाळ हवमानामुळे या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पाने खाणार्या किडींचा प्रादुर्भाव दिसला तर या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही, 500 मि.ली. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. कुळीथ पिकाचे धान्य चांगले कडक उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. सुधाीर वाण : सीना या वाणास तयार होण्यास 115 ते 120 दिवस लागतात तर माण वाणास तयार होण्यास 100 ते 105 दिवस लागतात.