हरित गृहासाठी आच्छादन म्हणून शेडनेटचा वापर केल्यास त्यास 'शेडनेट हाऊस' म्हणतात. शेडनेट हाऊसचा मुख्य उद्देश उन्हाची तीव्रता कमी करून रोपांना बाह्य संरक्षण देणे हा होय.
जी. आय. किंवा एस. एस. गोल किंवा चौकोनी पाईप वापरून शेटनेट हाऊसची उभारणी करता येते. आणखी कमी खर्चात शेडनेट हाऊसची उभारणी करता येते. आणखी कमी खर्चात शेडनेट हाऊस उभारायचे झाल्यास बल्ली, बांबू, सुरू किंवा निलगिरीचा वापर करून लाकडी सांगाड्यात शेडनेट उभारता येते. परंतु पाईपच्या तुलनेत लाकडी सांगाड्याचे आयुष्यमान कमी असते.
बाजारामध्ये 30 टक्के, 50 टक्के आणि 75 टक्के प्रमाणाची शेडनेट उपलब्ध आहे. ही शेडनेट विविध रंगांत म्हणजे हिरवा, पांढरा, चंदेरी, करडा आणि काळ्या रंगात उपलब्ध असते. हिरव्या रंगाची शेडनेट खास करून रोपवाटिकेसाठी वापरली जाते. पांढर्या चंदेरी आणि करड्या शेडनेटचा उपयोग पीक लागवडीसाठी केला जातो. शेडनेटचे आयुष्य सरासरी 24 ते 30 महिन्यांपर्यंत असते. शेडनेटमध्ये कोथिंबीर, मिरची, ढोबळी मिरची, कोबी वर्गीय पिके, कारली, काकडी, टोमॅटो अशा पिकांची लागवड करता येते. शेडनेटमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रणासाठी फॉगर यंत्रणेचा वापर करता येतो. शेडनेटमधील पिकांना पाणी आणि खत देण्यासाठी ठिबक सिंचनाचाच वापर करणे फायद्याचे असते.
– विनायक सरदेसाई