भूमिपुत्र

भरघोस उत्पन्न देणारी मटारची नवी प्रजाती विकसित, जाणून घ्या अधिक…

Arun Patil

मटारच्या रोपातील एका देठाला सामान्यतः एक किंवा दोन फुले लागतात. अर्थातच एक किंवा फारतर दोन शेंगा एका देठाला लागतात. परंतु संशोधकांनी मटारच्या काही नव्या प्रजाती शोधून काढल्या असून, यात एका देठाला पाचपर्यंत फुले लागू शकतात आणि त्यामुळे शेंगांची संख्या वाढून उत्पादन अनेक पटींनी वाढू शकते.

भारतात प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून वाटाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच भाजी म्हणून ताजे मटार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हॉटेलमधील भाज्यांमध्ये मटारचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. भारतीय संशोधकांनी मटारची नवी प्रजाती विकसित केली असून, अधिक फुले येणारी ही प्रजाती आहे. अर्थातच, फुलांची संख्या वाढल्यामुळे शेंगांची संख्याही अधिक असेल आणि त्यामुळे शेतकर्‍यांना मिळणारा नफाही वाढू शकेल.

मटारच्या सामान्य प्रजातीत रोपाच्या प्रत्येक देठाला एक किंवा जास्तीत जास्त दोन फुले येतात. संशोधकांनी विकसित केलेली नवी प्रजाती हा व्हीएल-8 आणि पीसी-531 या दोन प्रजातींचा संकर आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या नव्या प्रजातीला सुरुवातीस प्रत्येक देठावर दोन फुले लागतील. परंतु या प्रजातीच्या चार पिढ्यांनंतर प्रत्येक देठावर दोनपेक्षा अधिक फुले लागतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे एकाच देठावर अधिक शेंगा लागून शेतकर्‍यांचे उत्पादन कित्येक पटींनी वाढू शकते. अशा परिस्थितीत एकाच देठाला पाच-पाच फुले लगडणारी ही नवीन प्रजाती मटार उत्पादक शेतकर्‍यांसाठी खूषखबर ठरली आहे.

व्हीआरपीएम-901-3 आणि व्हीआरपीएसईएल-1 या दोन प्रजातींच्या प्रत्येक देठावर तीन किंवा अधिक फुले आल्याचे दिसून आले आहे. अन्य एक प्रजाती संशोधित करण्यात आली असून, व्हीआरपीएम-901-5 असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. या प्रजातीच्या एका देठावर तब्बल पाच फुले आल्याचे दिसून आले आहे. मटारची विकसित अशी व्हीआरपीएम-901-5 ही संकरित प्रजाती वाराणसी, दिल्ली आणि कर्नालच्या संशोधकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आकारास आली आहे. प्लॉस या शेतीविषयक नियतकालिकाच्या ताज्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एका देठावर दोनपेक्षा अधिक फुले लागणार्‍या या प्रजातींमधून मटारचे अधिक उत्पादन होत असल्याचे दिसून आले आहे. मटारवर अवलंबून असलेले उद्योग आणि संशोधकांनाही या संशोधनामुळे बळ मिळणार असून, याहून अधिक प्रगत प्रजाती विकसित करण्याची प्रेरणाही मिळणार आहे. याहून अधिक फुले आणि शेंगा देणार्‍या मटारच्या प्रजाती शोधून काढण्याचे काम निरंतर सुरूच राहणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, बहुपुष्पन देणार्‍या म्हणजेच एका देठाला एकापेक्षा अधिक फुले देणार्‍या काही प्रजातींमध्ये शेंगांची संख्या मात्र अधिक नसते.

व्हीआरपीएसईएल-1 पी ही अशी प्रजाती आहे, ज्यात देठ बारीक असल्यामुळे फुले अधिक लागली तरी अधिक शेंगा येत नाहीत. त्यासाठी पुरेसा आधारच मिळत नाही. त्यामुळे फुले आणि शेंगा परिपक्व होण्यापूर्वी गळून जातात, असे पाहायला मिळते. बहुपुष्पन करणार्‍या काही प्रजातींमध्ये रोपे उशिराने परिपक्व होतात आणि या रोपांच्या पुष्पधारणेच्या अवस्थेतच अधिक तापमानाचा प्रभाव पडून फुले गळतात. या पार्श्वभूमीवर, मटारच्या नव्या प्रजाती अधिक उत्पादन देऊन शेतकर्‍यांना अधिक उत्पन्न मिळवून देतील, यात शंकाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT