उन्हाळ्यात ज्याप्रमाणे माणसांना त्रास सहन करावा लागतो त्याचप्रमाणे जनावरांनाही त्याचा त्रास होत असतो. अनेक दुधाळ जनावरांना उष्माघात झाल्यास त्याचा दुधच्या उत्पादनावरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी त्यांच्या निवासापासून चारा व्यवस्थापनापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपल्याकडे उन्हाळा फारच कडक असतो. साधारणपणे जेव्हा तापमान 90 अंश फॅ. पेक्षा जास्त होण्यास सुरुवात होते तेव्हा उष्णतेचे परिणाम जाणवतात. उष्माघाताची तीव्रता ही जनावरांचा प्रकार, वय, उष्माघाताचा कालावधी, आहारातील हिरव्या चार्याची कमतरता यावर अवलंबून असते. शुद्ध जातीच्या विदेशी गायी, म्हशी आणि संकरित जनावरांवर उष्माघाताचा देशी गायींच्या तुलनेत अधिक परिणाम होतो. तेव्हा उन्हाळ्यात योग्य पद्धतीने जनावरांचे व्यवस्थापन केल्यास उष्णतेचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो आणि दूध उत्पादन क्षमताही कायम ठेवू शकतो.
उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यास जनावरांच्या शरीरातून घाम स्रवणाची क्रिया होते आणि जनावरे अशा तर्हेने वातावरणातील उष्ण तापमानाशी जुळवून घेऊन शरीराचे संतुलन राखतात; परंतु त्यानंतर देखील तापमानाने विशिष्ट पातळी ओलांडल्यास बाहेरील तापमानाशी जुळवून घेण्याच्या जनावरांच्या शरीराच्या कार्यावर ताण पडून हे कार्य बिघडते. थोडक्यात तापमान नियोजन करणार्या घाम ग्रंथीमध्ये बिघाड होतो आणि उष्माघाताची लक्षणे दिसू लागतात.
उष्माघाताची काही लक्षणे आढळतात. त्यामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान 104 ते 106 अंश फॅ.पर्यंत किंवा यापेक्षा जास्त होते. जनावरांचे तोंड कोरडे पडते आणि जनावरे जास्त पाणी पितात. जनावरांची भूक मंदावते. जनावरे सुस्तावतात. त्यांच्या नाकावरील त्वचा कोरडी पडते, डोळे निस्तेज दिसतात. शरीराची कातडी कोरडी आणि गरम होते. श्वासोच्छ्वास आणि नाडीची गती वाढते.
काही जनावरांत अतिसार होतो आणि लघवी कमी प्रमाणात होते. जनावरे चक्कर येऊन खाली कोसळतात. आहार कमी झाल्यामुळे दूध उत्पादनात घट येते.
उष्माघात टाळण्यासाठी काही उपाय आहेत.जनावरांचे गोठे उंच ठिकाणी आणि हवेशीर असावेत. गोठ्यात छप्पर मध्यभागी 15 फूट आणि बाजूस 6 ते 8 फूट उंच असावे. प्रत्येक जनावरास 65 ते 75 चौ. फूट जागा असावी. गोठ्याच्या भोवती गडद छाया देणारी झाडे लावण्याची व्यवस्था करावी. जनावरांच्या शरीराचे तापमान सरासरीच्या जवळपास ठेवण्यासाठी दुपारी 12 ते 4 च्या सुमारास जनावरांच्या अंगावर बादलीने थंड पाणी टाकावे किंवा थंड पाण्याच्या फवार्याची व्यवस्था करावी. ही क्रिया 3 ते 4 वेळा करावी. गोठ्याचे छप्पर पत्र्याचे असल्यास त्यावर गवत, पालापाचोळा टाकावा. सायंकाळी थंड पाण्याने दुधाळ जनावरांना धुवून काढावे. यामुळे स्वच्छतेसोबत जनावरांना थंडावा मिळतो. अधिक दूध देणार्या गायी, म्हशी असल्यास गोठ्यात कूलरची किंवा विद्युत पंख्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर त्यांच्या आहार व्यवस्थापनाकडेही लक्ष द्यायला हवे. जनावरांना उन्हाच्या वेळी चरण्यासाठी फिरवू नये.
दुधाळ जनावरांना सकाळच्यावेळी आणि संध्याकाळच्यावेळी चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चरायला सोडावे. त्यामुळे ते अधिक चारा खातात. आहारातील कोरड्या चार्याचे प्रमाण कमी करावे आणि हिरव्या चार्याचे आणि खुराकाचे प्रमाण वाढवावे. चारा दिवसांतून 3 ते 4 वेळा विभागून द्यावा. एकाच प्रकारचा चारा न देता चारा वैरणीमध्ये विविधता ठेवावी आणि वेगवेगळ्या प्रकारचा चारा मिश्रण करून द्यावा. खुराकामध्ये क्षारमिश्रण आणि मिठाचे योग्य प्रमाण वापरावे. जनावरांना स्वच्छ, थंड पाणी मुबलक प्रमाणात 5 ते 6 वेळा पाजावे. अशा प्रकारे काळजी घेतल्यास जनावरांचा उष्माघात टाळण्यास मदत होईल.