भूमिपुत्र

पशूनिगा : पावसाळा आणि जनावरांचे आरोग्य

अमृता चौगुले

ऋतुमानात बदल झाला की माणसांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवतो तसाच तो जनावरांच्या आरोग्याबाबतही दिसून येतो. पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते आणि त्याला पाळीव जनावरे बळी पडू शकतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात पाळीव जनावरांची काळजी कशी घ्यावी, हे समजून घेणे आवश्यक आहे.

प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात प्रचंड बदल होतात आणि त्याचा परिणाम पृथ्वीतलावर वावरणार्‍या प्रत्येक जीवावर होत असतो. मग ते मानव पशु-पक्षी असोत वा सूक्ष्म जीवजंतू असोत. पावसाळ्याच्या सुरुवातीलासुद्धा वातावरणात अनुकूल तसेच प्रतिकूल बदल होतात आणि पावसाळ्यात अस्वच्छता-दुर्गंधीमुळे जनावरे विविध रोगांंना बळी पडू शकतात. त्यामुळे गोठ्यातील स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. पावसाळ्यात तापमान कमी असले तरी हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढते आणि यामुळे गोठ्यात ओलसरपणा कायम राहतो. अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू आणि बुरशीची वाढ चांगली झाल्यामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते.

गोठ्यात खाच, खड्डे असतील तर पावसाळ्यापूर्वी ते मुरूम टाकून बुजवावेत. मलमूत्राचा योग्य निचरा होण्यासाठी गोठ्यात थोडा उतार काढावा आणि नालीद्वारे मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावावी. पावसाच्या पाण्याची अडवणूक करण्यासाठी गोठ्याच्या बाहेरील बाजूस गोणपाटाचे पडदे लावावेत. यामुळे जास्त गारव्याचा त्रास होणार नाही. गोठ्यातील जमीन कोरडी करण्यासाठी चुन्याची पावडर गव्हाच्या किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर गोठ्यात अंथरावा. यामुळे हवेतील आर्द्रता शोेषण्यास मदत होईल. पावसाळ्यात निश्चितच जीवजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे जनावरांना रोगमुक्त ठेवण्यासाठी गोठ्यात कमालीची स्वच्छता असावी. त्यासाठी गोठा जंतूनाशक द्रावणांनी अधूनमधून स्वच्छ करावा.

आपल्याकडील जनावरांना होणारे विविध आजार हे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवीजन्य असतात. पावसाळ्यात माशी, गोचीड, गोमाशी, डास, पिसू, उवा इत्यादींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यामुळे मोठ्या जनावरांत 'सर्श' थायलेरिऑसीस, बॉबेसिओसीस तसेच लहान जनावरांमध्ये ब्ल्यू टंग, डुकरांमध्ये जापानीज इन्सेफालायटीस इत्यादी सारखे आजार होतात. त्यामुळे स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. गोठ्याच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. शेणाची, मलमूत्राची विल्हेवाट गोठ्यापासून दूर अंतरावर करावी. जवळपासची झुडपे आणि गवत काढून परिसर स्वच्छ करावा.

सर्व लहान-मोठ्या जनावरांमध्ये आंतर परजीवींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी जंतनाशके पाजावीत. याच वातावरणात कासेेचा दाह (मस्टायटीस) या आजाराचे प्रमाण वाढते. यासाठी दूध काढण्यापूर्वी किंवा दूध काढल्यानंतर पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावणाने कास स्वच्छ धुवावी. संसर्गजन्य रोगांपासून तोंडखुरी, पायखुरी, एच. एस., बी फ्ल्यू इत्यादी सारख्या आजारांचे मान्सूनपूर्व लसीकरण पशुवैद्यकाकडून करून घ्यावे.

पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात सर्वत्र असल्यामुळे बरेचदा जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ल्यामुळे तसेच दूषित पाण्यामुळे पोटफुगी, हगवणीसारखे पचनसंस्थेचे आजार प्रामुख्याने बघायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा हिरव्या चार्‍यासोबत वाळलेला चारा आणि पेंढ द्यावी. गाभण जनावरांना गर्भधारणेच्या शेवटच्या काळात सकस आणि समतोल आहार द्यावा. याच ऋतूत जनावरे माजावर येण्याचे सुद्धा प्रमाण जास्त असते.

पावसाळ्यात लहान वासरे, करड यांच्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांना शक्यतो वेगळ्या जागेवर ठेवावे. त्यासाठी कोरड्या ठिकाणी मुबलक हवा आणि प्रकाश येईल याची आणि जागा कोरडी राहील या बाबींची काळजी घ्यावी. पावसाळ्यात जनावरांच्या खाद्याची साठवण हा एक गंभीर प्रश्न उद्भवतो. त्यासाठी कोरड्या ठिकाणी जिथे पावसामुळे खाद्य ओले होणार नाही, याची काळजी घ्यावी. खाद्य ओले झाल्यास बुरशीच्या प्रादुर्भावामुळे विषबाधा होऊ शकते. जनावरांच्या आरोग्यसंबंधी कुठलाही स्वत: घरगुती उपाय न करता नियमित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा.
– विलास कदम

SCROLL FOR NEXT