करटोली ही भाजी सध्या तरी फक्त विशिष्ट लोकांनाच ज्ञात आहे. कारल्यासारख्या दिसणार्या पण आकाराने लहान अशा या फळाची भाजी करून खातात. करटोलीचे शास्त्रीय नाव मोमोर्डीका डिओइका असून इंग्रजी नाव स्पाईन गोर्ड असे आहे. या भाजीमध्ये इतर वेलवर्गीय भाज्यांपेक्षा पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील जंगलांमध्ये करटोली आढळून येते. महाराष्ट्रात हे पीक फक्त खरीप हंगामात आढळून येते. परंतु उत्तर पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये हे पीक उन्हाळी हंगामात होते. डोंगर उताराची किंवा पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि हलकी ते मध्यम जमीन करटोली पिकास मानवते. करटोलीचे फळ उंच-दीड इंच लांब, काटेदार, हिरव्या रंगाचे, टोकदार आणि लंबगोल आकाराचे असते. करटोली या पिकावर फारसे संशोधन झालेले नाही.
तरीही सर्वसाधारपणे करटोलीच्या फळाच्या आकारावरून या भाजीचे अंडाकृती फळांच्या जाती, मध्यम गोल फळांच्या जाती आणि मोठ्या आकाराची गोल फळे असलेल्या जाती असे तीन प्रकार पडतात. करटोली पिकाची लागवड कंदापासून केली जाते. या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. म्हणून लागवड केलेल्या क्षेत्रात फळधारणेसाठी 10 टक्के नर वेलांची संख्या असणे आवश्यक असते. करटोली वेलांची लागवड बियांपासून देखील करता येते. परंतु बियांची उगवण अतिशय कमी प्रमाणात होते. एक कंद एकाच जागी दोन ते तीन वर्षे राहिल्यास त्याला 4 ते 5 जोड कंद तयार होतात. लागवडीसाठी असा कंद खोदून काढावा, त्याचे कंद वेगळे करावेत आणि त्याचा नवीन लागवडीसाठी मे महिन्याच्या अखेरीस जमिनीत 1.5 ते 2 मीटर अंतरावर 60 से.मी. रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस 1 मीटर अंतरावर 30ु30ु30 सेमी आकाराचे खड्डे काढून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात 1.5 ते 2 किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळून घ्यावे. लागवडीच्या वेळी प्रत्येक आळ्यात शेणखताशिवाय 10 ग्रॅम कार्बारील
(10 टक्के) टाकून खत मातीबरोबर चांगले मिसळून द्यावे आणि त्यानंतर प्रत्येक आळ्यात एक कंद लावावा. कंदांना फुटलेले कोंब मोडाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर करटोलीचे वेल जोमाने वाढू लागल्यानंतर त्यांना आधार देण्यासाठी बांबूच्या उपयोग करावा. वेलाच्या आजूबाजूने खुरपणी करून आळ्यांना मातीची भर द्यावी. या पिकावर कीड आणि रोगांचे प्रमाण कमी आढळते, तरीही प्रादुर्भाव आढळल्यास पीक संरक्षण वेळेवर करावे. जून महिन्यात लागवड केलेल्या करटोलीच्या वेलीवर जुलै महिन्याच्या शेवटी (40 ते 45 दिवसांनी) फळे तयार होण्यास सुरुवात होते. कोवळ्या फळांची दर 3 ते 4 दिवसांच्या अंतराने नियमित काढणी करावी. प्रत्येक वेलीपासून सरासरी 1 ते 1.5 किलो फळांचे उत्पादन मिळते. अशा प्रकारे या पिकाचे प्रति हेक्टरी 8 ते 10 टन उत्पादन मिळते. हे उत्पादन सप्टेंबर महिन्यांपर्यंत मिळते. विशेष म्हणजे पाऊस कमी झाल्यावर करटोलीचे वेल आपोआप वाळू लागतात. मात्र कंद सुप्त अवस्थेत जिवंत राहतात आणि पुढील वर्षी मे महिन्यात अशा कंदांना परत फुटवे फुटू लागतात.
– विलास कदम